
दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
पूजा आठवीतील वर्गात शिकत असताना शाळेशेजारी धान्य मळणीचं काम सुरू होतं. या मळणी यंत्रातून धान्याचा भुसा उडायचा. हवेसोबत हे भुशाचे कण वर्गात यायचे. त्यामुळे मुलांना खोकला येत असे. शेती क्षेत्रात धान्य मळणीचे यंत्र सर्रास वापरले जाणारे यंत्र आहे. पण हे यंत्र आरोग्यास धोकादायक देखील आहे. ग्रामीण भारतात, या धुळीच्या संपर्कात आल्याने दीर्घकालीन खोकला, श्वसनाचे त्रास, अॅलर्जी आणि श्वसन संक्रमण होऊ शकते. विशेषतः लहान मुले आणि शेतमजुरांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. पूजाने ही बाब हेरली. या धुळीपासून रक्षण करण्यासाठी तिने एक यंत्र विकसित केले. या अभिनव प्रयोगामुळे तिने जपानमध्ये पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधीत्व केले. तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा न गेलेल्या पूजाचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील सिरौली गौसपूर तहसील भागातील अगेहरा या छोट्याशा गावात पूजा पाल राहते. पूजा ही कुटुंबातील पाच मुलांपैकी एक आहे. तिचे वडील, पुट्टीलाल, रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत आणि तिची आई, सुनीला देवी, गावातील सरकारी शाळेत मध्यान्ह जेवण बनवते. मातीच्या भिंती आणि गवताने साकारलेले छप्पर असं तिचं घर. वर्षानुवर्षे पूजाच्या घरात वीज नव्हती. रॉकेलच्या दिव्यावर ती आणि तिची भावंडे अभ्यास करत असत. तिचे आई-बाबा नेहमी म्हणत ‘आम्ही कमी खाऊ, पण तुम्ही सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. कारण शिक्षणच तुम्हाला पुढे घेऊन जाईल.’
आठवी इयत्तेत शिकत असताना पूजाच्या लक्षात आले की, तिच्या शाळेतील मुले जवळच्या मळणी यंत्रातील धुळीमुळे खूप खोकतात. हवा बारीक भुसाच्या कणांनी भरलेली होती जी या मुलांच्या फुप्फुसांत जाई. हाच त्रास शेत मजुरांनादेखील होत असे. ती धूळ पूजाच्या मनात बसली. तिने स्वतःला विचारले, आपण याबद्दल काही करू शकतो का? यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे.
काहीतरी कृती करण्याचा निर्धार करून, तिने तिच्या शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि एका वेल्डरच्या मदतीने एक मॉडेल यंत्र तयार करण्यास सुरुवात केली. या यंत्राच्या अनेक चाचण्या केल्या. अनेक चुका झाल्या त्या सुधारल्या. असे करत तिने एक धूळमुक्त थ्रेशर तयार केले. एक डब्बा आणि पंखा यांच्या मदतीने उडणारी धूळ एका पाण्याच्या पिशवीमध्ये जमा होत असे. असे हे यंत्र होते. या यंत्रासाठी ३ हजार रुपये खर्च आला. हा खर्च पूजाच्या कुटुंबासाठी फार मोठा होता. गावातील लोक पूजाची थट्टा करायचे. ‘तू हे का करत आहेस? तुला काय मिळेल?’ असे ते म्हणायचे. पूजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष दिले.
पूजाचे विज्ञान विषयाचे शिक्षक राजीव श्रीवास्तव यांनी तिला तिचा प्रकल्प इनस्पायर मानक (INSPIRE – MANAK) मध्ये सादर करण्यास मदत केली. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सुरू केलेला, INSPIRE (इनोव्हेशन इन सायन्स पर्सुइट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च) हा तरुण वैज्ञानिक मनांना जागृत करण्यासाठी एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी स्थानिक पातळीवर रुजलेल्या कल्पना सादर करू शकतात जे वास्तविक जगातील समस्या सोडवतात. निवडलेल्यांना मार्गदर्शन आणि प्रोटोटाइप तयार करण्यासाठी अनुदान मिळते, जे नंतर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित केले जातात.
२०२३ मध्ये, पूजा पालचा शोध भारतातील हजारो प्रवेशिकांमधून निवडला गेला. ६० राष्ट्रीय विजेत्यांपैकी, ती उत्तर प्रदेशातील एकमेव होती. तिचे धूळमुक्त थ्रेशर मॉडेल २०२४ मध्ये राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आले होते. या यंत्राने त्याच्या कमी किमतीच्या, उच्च-प्रभावाच्या डिझाइनसाठी प्रशंसा मिळवली. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आता तिच्या मॉडेलचे पेटंट घेण्यासाठी काम करत आहे. हा ग्रामीण विद्यार्थ्यासाठी एक दुर्मीळ सन्मान आहे.
२०२५ मध्ये पूजाची जपानमधील साकुरा सायन्स हायस्कूल प्रोग्रामसाठी निवड झाली. जपान सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी एजन्सी (जेएसटी)द्वारे हा एक प्रतिष्ठित उपक्रम आहे जो जगभरातील अव्वल विज्ञान विद्यार्थ्यांना एका आठवड्यासाठी एकत्रितपणे शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एकत्र आणतो. भारतातील हजारो नामांकित विद्यार्थ्यांपैकी फक्त ५४ विद्यार्थ्यांची निवड झाली. या ठिकाणी सुद्धा पूजा ही उत्तर प्रदेशातील एकमेव विद्यार्थिनी होती.
विज्ञान उपक्रमांना उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना टोकियोच्या सहलीवर देखील नेण्यात आले. पूजासाठी, हा एक अविस्मरणीय अनुभव होता. जपानी माणसांची अदब, पाहुणचार, कमालीचा नम्रपणा तिच्या मनाला भावला.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर, पूजाला एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून तिला तिचा महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च स्वतःच उचलायचा आहे. त्याचसोबत आपल्या आई-वडिलांना आर्थिक मदत सुद्धा करायची आहे. पूजा म्हणते की, तिला इतके मोठे व्हायचे आहे की जे लोक एकेकाळी आपल्याला तुच्छ मानत होते त्यांना आपली खरी क्षमता दाखवून द्यायची आहे.
आपण कोणत्या परिस्थितीत वाढलो हे महत्त्वाचे नाही तर आपण आपली परिस्थिती बदलण्यासाठी काय प्रयत्न करतो हे महत्त्वाचे आहे. पूजा पालने स्व-कर्तृत्वाने हे सिद्ध केले.