गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपी मुलाने स्वतःलाही गंभीर जखमी करून घेतले असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा प्रकार नेमका कधी घडला, याची निश्चित माहिती नसली तरी, मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शेजाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृत आईचे नाव पूजा तेली असून हल्लेखोर मुलाचे नाव अनिकेत तेली(वय २५) आहे. ते सुपलवाडी नाचणे परिसरात राहतात.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुलाने धारदार शस्त्राने आईच्या गळ्यावर वार केले. यात आईचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर आरोपी मुलाने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मुलाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कौटुंबिक वाद किंवा अन्य काही कारणामुळे हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत आणि लवकरच या घटनेमागील सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे. गणेशोत्सवासारख्या आनंददायी सणात घडलेल्या या घटनेमुळे नाचणे गावात आणि रत्नागिरी शहरात शोकाची छाया पसरली आहे.