
मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके
आपण मागील काही लेखांत योगदर्शनातील धारणा, ध्यान या अंतरंगयोगातील दोन महत्त्वाच्या पायऱ्यांचा विचार केला. आता समाधी या अंगाविषयी जाणून घेऊ. पातंजल योगसूत्रानुसार योगाच्या आठ अंगातील अंतिम आणि अंतरंग योगातील तिसरी व शेवटची पायरी म्हणजे समाधी. ध्यान शब्दाप्रमाणेच हा शब्दही आपल्याला परिचित आहे. एखादी व्यक्ती एखाद्या विचारात गढून गेली असता तिला आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींचा अजिबात भान नसतं. अशावेळी आपण त्या व्यक्तीला ‘समाधी लागली’ असं म्हणतो. पुष्कळ वेळा ध्यान आणि समाधी या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखा मानला जातो; परंतु योगदर्शनानुसार ध्यान आणि समाधि या दोन्ही अवस्थांमध्ये भेद आहे. पातंजल योगदर्शनानुसार समाधी हे संपूर्ण योगविद्येच्या ज्ञानाचं आणि साधनेचं अंतिम ध्येय आणि फलित आहे. समाधी अवस्था प्राप्त करता यावी म्हणूनच खरंतर योगदर्शन प्रवृत्त झालं आहे. समाधि या शब्दाची व्युत्पत्ती ‘सम्यक् आधीयते अस्मिन्’ अशी केली जाते. याचा अर्थ ‘ज्या ठिकाणी मन नीट ठेवता येतं ती समाधी’ म्हणजे ज्या अवस्थेमध्ये मन अत्यंत स्थिर होते ती अवस्था म्हणजे समाधि. पतंजलींनी योगसूत्र या आपल्या ग्रंथात समाधीचे स्वरूप आणि व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे. ‘तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधि:l’ याचा अर्थ ध्यानाच्या अवस्थेत ज्या क्षणी ध्यान करणाऱ्या साधकाला स्वतःची विस्मृती होते म्हणजे स्वरूपशून्यता प्राप्त होते, ज्यावर ध्यान करतो तो विषयच केवळ अनुभवाला येतो, तोच भासमान होत रहातो (अर्थमात्रनिर्भास) त्यावेळी त्या अवस्थेला समाधि असं म्हणतात. मागील काही लेखांत पाहिलेल्या धारणा आणि ध्यान या अवस्थांच्या पुढची अवस्था म्हणजे समाधि होय. धारणेमध्ये पंचज्ञानेंद्रियांना बाह्य विषयांपासून दूर करून आपले सगळे विचार एकाच लक्ष्यावर केंद्रित करायचे असतात. परंतु धारणेमध्ये चित्त कितीही केंद्रित केले तरी लक्ष्यवस्तुविषयीसुद्धा वेगवेगळे विचार येत राहतात. धारणेचा अभ्यास करता करता त्यांपैकी एकच विचार प्रबळ होतो. अशा प्रबळ झालेल्या एकाच विचारावर मन पूर्णपणे केंद्रित होणं ही ध्यानाची अवस्था होय. धारणा प्रयत्नपूर्वक केली जाते तर धारणेच्या पुष्कळ सरावानं ध्यान आपोआप लागतं. ज्याप्रमाणे धारणेच्या पुढची पायरी ध्यान त्याप्रमाणेच ध्यानाच्या पुढची पायरी समाधी होय. धारणा आणि ध्यान या दोन्ही अवस्थांमध्ये ध्यान करणाऱ्या व्यक्तीला आपण लक्ष्यवस्तूपेक्षा भिन्न आहोत ही जाणीव असते; परंतु समाधीमध्ये ज्याचं ध्यान करायचं त्या वस्तूव्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही. चित्त ध्येयवस्तूशी इतकं तन्मय होतं की, ‘मी ध्यान करत आहे’ ही जाणीव म्हणजे स्व-अस्तित्वाची जाणीवही गळून पडते. मन पूर्णतः निर्विचार होऊन ध्येयवस्तूस्वरूपच होऊन जातं. अशी पूर्णतः निर्विचार, तद्रूप अवस्था म्हणजे समाधि. ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये ध्याता म्हणजे ध्यान करणारा, ध्येय म्हणजे ज्यावर ध्यान करायचे ती वस्तू आणि ज्यायोगे ध्यान करायचं ते साधन म्हणजे ध्यान अशी तीन तत्त्वं असतात. या तिन्हींना मिळून ‘ध्यानत्रिपुटी’ असं म्हटलं जातं. समाधीच्या अवस्थेमध्ये या तीनपैकी ध्यान करणारा ध्याता आणि ध्यान ही दोन तत्त्वं लोप पावतात आणि चित्त केवळ ध्येयवस्तूशी एकरूप होतं. वस्तुतः ते ध्येयरूपच होतं. या अवस्थेचं स्वरूप समजावताना एक सुंदर उपमा दिली जाते. वारा नसलेल्या ठिकाणी दीपज्योत ज्याप्रमाणे निश्चल होते, शांतपणे तेवत राहते त्याप्रमाणे समाधीअवस्थेत चित्त पूर्णतः निर्विचार होतं आणि ध्येयाशी एकरूप होऊन अत्यंत निश्चल राहातं. ध्याता आणि ध्येय विषयातलं अंतर नाहीसं होऊन एकरूपता आल्यानंतर, स्वतःसंबंधीचे भान हरपते तेव्हा ध्येयविषयाचं दिव्य ज्ञान होऊ लागते. ही खरी समाधी अवस्था होय. खरंतर समाधी अवस्थेतील अनुभवाचं वर्णन शब्दांत करणं कठीण आहे. समाधी अवस्था हा निव्वळ स्व-अनुभवाचा विषय आहे. त्यामुळे समाधी अवस्थेचा अनुभव घेणाऱ्यांनी या अवस्थेचं वर्णन केलेलं दिसत नाही. तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत सांगायचं तर ही शब्दातीत अवस्था आहे. तसेच या अवस्थेत अनुभवणारा आणि जे अनुभवायचं यांमध्यें भेदच राहत नसल्यामुळे वर्णन करणार कोण? कुणासाठी? आणि कुणाचं? समाधी ही मानवी अनुभवाची सर्वोच्च अवस्था आहे. आजच्या गतिमान जीवनात समाधी अवस्था प्राप्त करणं हे मानवी जीवनाचं ध्येय नाही. परंतु योगविषयाविषयी जाणून घेताना योगाच्या परमध्येयाविषयी जाणून घेतलं नाही तर हा विषय अपूर्ण राहील.