दृकश्राव्य माध्यमातील सृजनशील दुवा

  21

कर्तृत्ववान ती राज्ञी : उमा दीक्षित


आज हरतालिका या दिवसाचे औचित्य साधून, गेली तीन दशके अखंड व्रतस्थ असल्याप्रमाणे विविध माध्यमांतून, विविध भूमिकांमधून मराठी सांस्कृतिक विश्वात आपली ठसठशीत ओळख निर्माण करणाऱ्या निवेदिका, मुलाखतकार, लेखिका उमा दीक्षित यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.


सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या पुणे शहरात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील, गोविंद शिंदे, हे विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतील कार्यकर्ते होते तसेच त्यांनी आदिवासींना तसेच कृष्ट रोगांना शांती वनासारखे घरकुल वसवून देण्याचे महान कार्य केले आहे तसेच त्यांची आई सुशीला शिंदे या राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागात अधिकारी पदावर कार्यरत होत्या. यामुळे घरातूनच समाजकार्याची व सेवाभावाची शिकवण उमाताईंना लाभली


त्यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर आईची मुंबईला बदली झाल्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण दादर येथील साने गुरुजी विद्यालयात झाले. शाळेतील निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा याच्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. रूपारेल महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी साहित्यात बी. ए. पूर्ण करून त्यानंतर मुंबई विद्यापीठातून एम. ए. केलं. एम. ए. करत असतानाच त्यांची आकाशवाणीच्या प्रसारण अधिकारी या पदावर निवड झाली आणि त्यांच्या कारकिर्दीला नवा आयाम लाभला.


१९८९ साली त्यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रात काम सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी ड्युटी रूममध्ये काम केलं, नंतर संगीत विभागात पंडित प्रभाकर पंडित यांच्यासोबत कार्य केलं. संगीताशी प्रत्यक्ष संबंध नसताना पंडितजींनी त्यांना आपलेसे केले आणि ध्वनिमुद्रणाची बारकावे शिकवले. याच काळात उमा यांनी पं. वामनराव सडोलीकर यांचे ध्वनिमुद्रण, पं. जसराज, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. व्ही. आर. आठवले, पं. के. जी. गिन्डे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांशी काम केलं. शाहीर साबळे, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर यांच्यासोबतही त्यांनी ध्वनिमुद्रणात सहभाग घेतला.


आकाशवाणी केंद्रातच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या समीर दीक्षित यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दोघांचेही क्षेत्र समान असल्याने दहा ते अकरा वर्षांनी कोणीतरी एकाने नोकरी सोडायची असा निर्णय त्यांनी घेतला व त्याप्रमाणे त्यांच्या यजमानांनी नोकरी सोडून त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला.


सेंट्रल सेल्स युनिट या मुंबईतीलच विभागात ताईंची बदली झाली आणि त्या काळातील चित्रलोक म्हणजेच सर्वात जास्त रेवेन्यू मिळवून देणाऱ्या कार्यक्रमाचे बुकिंग आणि पोर्टफोलिओ बनवण्याची जबाबदारी तसेच आकाशवाणी मुंबई केंद्रातील ड्युटी रूम, नाटक विभागाच्या कामाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत
असताना अनेक ज्येष्ठ दिग्गज व्यक्तीमत्त्वांकडून कितीही उंच शिखरावर असताना आपले पाय जमिनीवर घट्ट रोवण्याचे संस्कार मिळाल्याचे उमाताई आवर्जून सांगतात.
कोल्हापूर आकाशवाणी केंद्रात कार्यक्रम अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्यानंतर दोन्ही लहान मुलांना सांभाळून नोकरी करताना अनेक आव्हानांना त्यांना समोर जावं लागलं. त्यातलाच एक किस्सा म्हणजे, कोल्हापूरला दररोज संध्याकाळी ६ ते रात्री १० लोडशेडींग असायचं त्या दरम्यान मुलींसोबत गाणी गोष्टी सांगायला सुरुवात केली त्यामुळे लोडशेडिंगचे भान कोणाला उरलेच नाही. त्यामुळे समस्येतूनही उत्तम मार्ग निघाला.


उमाताईंनी विविध सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर आधारित कार्यक्रमांच्या निर्मितीची जबाबदारी लीलया पार पाडत आपल्या कामामधूनच सामाजिक भान अत्यंत उत्कृष्टरीत्या जपले आहे. मंत्र जगण्याचा ही युनिसेफ प्रायोजित मालिका, काळ्या ढगाची रुपेरी कडा, गाथा स्त्रीशक्तीची, किस्से रंगभूमीचे, स्वयंप्रकाशिता, यांसारख्या उल्लेखनीय मालिकांचे लेखन, दिग्दर्शन, संकलन, संकल्पना त्यांनी हाताळली. तसेच त्यांनी व. पु. काळे यांच्या कथांचे अभिनाट्य वाचन, नामवंत लेखकांच्या लिखाणावर आधारित मालिकेची निर्मिती तसेच कर्करोगासारखे वेगळे विषय देखील त्यांनी हाताळले. स्वयंपाकघरातील विज्ञान, कौटुंबिक समस्या, विनोबांची गीताई अशा पुस्तक वाचन मालिकाही त्यांनी केल्या. प्रत्येक महिलेच्या मनात पोहोचलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात उमाताईंचा सिंहाचा वाटा आहे. समाजातील प्रत्येक स्तरांपर्यंत, विषयांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध विषयांना त्यांनी कायम स्पर्श केला.


त्यानंतरच्या काळात त्यांनी अनेक रंगमंचीय नाटकांचे नभोनाट्य रूपांतर केले. माझा खेळ मांडू दे, सूर्य पाहिलेला माणूस अशा नाटकांत त्यांनी निर्मिती सहाय्यक म्हणून काम केलं. तर लेकुरे उदंड जाली, आयदान, वाऱ्यावरची वरात, हाच मुलाचा बाप यांसारख्या नाटकांची निर्मिती त्यांनी स्वतंत्रपणे केली.


आकाशवाणीवरील सुश्राव्य कार्यक्रमांची निर्मिती करणाऱ्या या यशस्वितेची बदली दूरदर्शन येथे झाली तिथेही त्यांनी उत्कृष्ट दर्जाचे कार्यक्रम आणि मालिका सादर केल्या. मैत्र हे शब्द/ताल सुरांचे, मायवटेचा मागोवा, कथा सईची, आकाश पेलताना, अक्षरांच्या वाटेवर, फेस टू फेस, विज्ञानंजनहिताय यांसारख्या मालिकांची निर्मिती केली.


त्यांनी तयार केलेले काही उल्लेखनीय माहितीपट म्हणजे एक लढाई जिंकलेली (टाटा मेमोरियलवरील माहितीपट), प्याऊ (मुंबईतील पाणपोया), आकाशाशी जडले नाते (डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर) आणि वेदनेवर विजय (कर्करोगाशी झुंज देणाऱ्या महिलांच्या मुलाखती).


आकाशवाणी, दूरदर्शन यावरील निवेदन, त्यांनी घेत असलेल्या मुलाखतीमधून अनेक दिग्गजांना, ज्येष्ठ कलावंतांना बोलत करणे त्यांचे प्रेरणादायी प्रवास सगळ्यांसमोर आणणे, नवनवीन उपक्रमांना व्यासपीठ मिळवून देणं या सगळ्या गोष्टींना एक उत्तम आयाम देण्यासाठी एक पारखी नजर ताईंकडे असल्याने उमा दीक्षित म्हणजेच दर्जेदार कार्यक्रम हे समीकरण निश्चित झालं. प्रत्येक वेळी आपल्या कामाप्रीत्यर्थ समर्पित भावनेने काम करून उत्तमात उत्तम संकल्पना प्रत्यक्षात कृतीत आणण्याच्या त्यांच्या या सृजनशील कार्यासाठी त्यांना विविध नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.


ताईंच्या या ऊर्जादायी प्रवासात त्यांनाही शारीरिक व्याधीला सामोरे जावे लागले; परंतु त्यातूनही स्वतःच्या क्षमतांचा शोध लागत असल्याचे उमाताई सांगतात.
आकाशवाणी आणि दूरदर्शन यावरील नवीन आव्हाने स्वीकारत सोशल मीडिया युट्युब या माध्यमांवर असणारी तरुण पिढीसाठी अजून उत्तम निर्मिती करण्याचे तसेच रिटायरमेंट नंतर तळागाळातील महिलांसाठी कार्य करण्याचे ध्येय त्यांच्यासमोर त्यांनी ठेवले आहे.


उमा समीर दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे संवेदनशीलतेचा, कलात्मकतेचा आणि सामाजिक जाणिवेचा सुरेख संगम आहे. लेखन, ध्वनीमुद्रण, संकल्पना, दिग्दर्शन, सादरीकरण, संशोधन या साऱ्याच क्षेत्रांमध्ये त्यांचे अनुभव म्हणजे जणू एक मार्गदर्शक संस्थाच आहे. अशा या मार्गदर्शक संस्थेला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा….

Comments
Add Comment

अवतरली...लाडाची नवसाची गौराई माझी

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर गणेशोत्सवात गौरीपूजन हा स्त्रियांसाठी अत्यंत मंगलमय व आनंदाचा सण मानला जातो.

उकडीचे मोदक

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे गणेशोत्सवात पारंपरिक उकडीचे मोदक तर आपण सगळेच करतो, पण जरा हटके वाटेल असे सुंदर

समाधी अवस्था

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके आपण मागील काही लेखांत योगदर्शनातील धारणा, ध्यान या अंतरंगयोगातील दोन महत्त्वाच्या

हर तन तिरंगा

तिरंगी फॅशन ट्रेंड!  सौंदर्य तुझं : प्राची शिरकर स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव!

दिव्यांगांसाठी आदर्श ‘घरकुल’

वैशाली गायकवाड डोंबिवलीपासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या खोणी गावात, एका सेवाभावी प्रयत्नातून साकारले

गरोदरपणातला मधुमेह

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा काळ असतो.