
सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश
मुंबई : वरळी येथील सेंच्युरी मिल मधील ४८८८.७८ चौ.मी.जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी सीमांकन करून सुद्धा, वाडिया आणि सेंच्युरी मिल व्यवस्थापन यांच्या वादामुळे सेंच्युरी कामगारांच्या घरासाठी मिळत नव्हती. हा वाद मिटल्यामुळे, या जागेची मागणी केल्याने नुकत्याच मॉनेटरी कमिटीत झालेल्या सुनावणीमध्ये ही जागा घरासाठी सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने देण्याची तयारी दर्शवली आहे.
गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग हे गेले १२ वर्ष ही जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी मिळावी म्हणून मॉनेटरी कमिटीकडे दाद मागत आहेत. नुकताच नसली वाडिया आणि सेंच्युरी मिल व्यवस्थापनाचा या जागेसंबंधी असलेला वाद मिटला आहे. हे समजताच प्रवीण घाग आणि सेंच्युरी एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर व जितेंद्र राणे यांनी यासंबंधी या सुनवणीवेळी हा प्रश्न उपस्थित केला आणि ही जागा मिळावी म्हणून जोरदार मागणी केली.
म्हाडाचे कार्यकारी अभियंता गावित यांनी सुद्धा ही जागा गिरणी कामगारांसाठी आहे, असे लेखी कळविले आहे. यामुळे सेंच्युरी मिल व्यवस्थापनाच्या प्रतिनिधी सुनीता थापलियाल यांनी सांगितले की, या जागेच्या विकासाची प्रक्रिया चालू करून गिरणी कामगारांना त्यांची घरे दिली जातील.
यामुळे या जागेवर वरळी येथे सेंच्युरी मिल गिरणी कामगारांना आणखीन ५८८ घरे मिळतील. मॉनेटरी कमिटीने दिलेल्या आदेशाप्रमाणे सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे गिरणी कामगार संघर्ष समिती व सेंच्युरी मिल एकता मंच या संघटनांनी समाधान व्यक्त केलेे.
यापूर्वी २०१२ साली एकूण १७९८०.६९चौ. मी.जागेपैकी १३०९१.९० चौ मी.जागा मिळाली होती. एवढ्या जागेवर कामगारांसाठी घर बांधणी होऊन कामगारांना २१३० घरे मिळाली आहेत. सेंच्युरी मिल पात्र गिरणी कामगारांची संख्या ८६८४ इतकी आहे. सेंच्युरी मिल चाळीतील राहत असलेल्या जागेपैकी सहा एकर जागा सुप्रीम कोर्टात झालेल्या निवाडाप्रमाणे ही जागा बीएमसीकडे गेली.
तेव्हा या जागेचा बीएमसीकडून विकास केला जाईल तेव्हा त्या जागेवरील सेंच्युरी मिल चाळ रहिवाशांचा कायद्याप्रमाणे पुनर्विकास करून उर्वरित जागेचा वापर बीएमसीने सेंच्युरी मिल कामगारांच्या घरासाठीच करावा, अशी मागणी केली.