Monday, August 25, 2025

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव आणि मोदकांची गोड परंपरा! बाप्पासाठी १० दिवस १० प्रकारचे हटके मोदक बनवा, ही सोपी रेसिपी पहा

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव आणि मोदकांची गोड परंपरा! बाप्पासाठी १० दिवस १० प्रकारचे हटके मोदक बनवा, ही सोपी रेसिपी पहा

गणेश चतुर्थी म्हटली की महाराष्ट्रात उत्साह, भक्ती आणि आनंदाचा सोहळा सुरू होतो. हा केवळ धार्मिक सण नसून, प्रत्येक घराला एकत्र आणणारा सांस्कृतिक उत्सव आहे. दहा दिवस चालणाऱ्या या पर्वात गणरायाला सर्व प्रकारच्या नैवेद्यांनी प्रसन्न करण्याची परंपरा आहे. त्यामध्ये मोदकाला विशेष महत्त्व आहे. मोदक हे गणपती बाप्पांचे अत्यंत आवडते खाद्य मानले जाते, म्हणूनच गणरायाच्या प्रत्येक नैवेद्यात त्याचा समावेश असतो. आजकाल घराघरात फक्त उकडीचेच नव्हे, तर विविध प्रकारचे मोदक बनवण्याची प्रथा वाढली आहे. नारळ-गुळाच्या सारणापासून ते ड्रायफ्रूट्स, चॉकलेट, केशर, पिस्ता, काजू-बदाम यांसारख्या नाविन्यपूर्ण चवींचे मोदकही बाप्पाला अर्पण केले जातात. जर तुम्ही यंदा दहा दिवस बाप्पांना घरी आणणार असाल, तर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून नैवेद्य दाखवणे हा एक वेगळाच अनुभव ठरू शकतो. भक्तीबरोबरच चवींचा आनंद घेण्याची ही उत्तम संधी आहे. चला तर मग दहा दिवसांसाठी दहा वेगवेगळ्या प्रकारच्या खास मोदकांच्या रेसिपी जाणून घेऊन या गणेशोत्सवाला अधिक गोड आणि अविस्मरणीय बनवा.

१. उकडीचे मोदक गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी बाप्पासाठी पारंपारिक उकडीचे मोदक उत्तम मानले जातात. नारळ आणि गूळ एकत्र करून सारण तयार केले जाते. तांदळाच्या पिठाची उकड घेऊन त्याचे आवरण बनवले जाते. त्यात सारण भरून मोदकाचा आकार देऊन वाफेवर साधारण १५ मिनिटे शिजवले की गरमागरम मोदक तयार होतात.

२. तळलेले मोदक उकडीच्या मोदकाचेच सारण वापरून हे मोदक तयार होतात. फरक इतकाच की त्यांना वाफेवर शिजवण्याऐवजी तुपात सोनेरी रंग येईपर्यंत तळले जाते. खुसखुशीत आणि कुरकुरीत चव यामुळे हे मोदक खास लोकप्रिय आहेत.

३. रवा मोदक रव्याचे मोदक हलके आणि लवकर तयार होतात. रवा तुपात भाजून घ्यावा आणि त्यात दूध व साखर मिसळून मिश्रण तयार करावे. त्यात नारळाचे सारण भरून मोदकाचा आकार दिला की हा गोड पदार्थ लगेच तयार होतो.

४. काजू मोदक भाजलेले काजू बारीक करून त्यात मिल्क पावडर आणि थोडं दूध मिसळून गोळा तयार करतात. हा गोळा मोदकाच्या साच्यात भरला की सुंदर आणि मऊसर काजू मोदक तयार होतो. लाडू आणि बर्फीप्रमाणेच हे मोदकही मुलांना खूप आवडतात.

५. ड्रायफ्रूट मोदक आरोग्यदायी आणि पौष्टिक मोदक बनवायचे असतील तर ड्रायफ्रूट मोदक उत्तम पर्याय आहे. बदाम, काजू, पिस्ता जाडसर वाटून घ्यावे, त्यात खजूर आणि खोबऱ्याचे मिश्रण घालून मोदक वळले की गोड, पौष्टिक आणि कुरकुरीत चवीचे मोदक तयार होतात.

६. चॉकलेट मोदक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे चॉकलेट मोदक गणेशोत्सवात वेगळा आनंद देतात. वितळलेल्या चॉकलेटमध्ये खोबरे किंवा बदामाचे मिश्रण घालून मोदकाच्या साच्यात भरतात. नंतर दोन तास फ्रिजमध्ये ठेवले की खास चॉकलेटी मोदक तयार होतात.

७. मावा मोदक खोवा तुपावर छान परतून घ्या. त्यात वेलची पावडर आणि केशर मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण थंड झाल्यावर मोदक वळले की श्रीमंती चवीचे मावा मोदक तयार होतात.

८. नारळाचे मोदक कमी वेळ आणि कमी साहित्य लागणारे हे मोदक अतिशय सोपे आहेत. नारळाचा किस तुपात हलकासा परतून घ्या, त्यात कंडेन्स्ड मिल्क मिसळून गोडसर मिश्रण तयार करा. हे मिश्रण थंड झाल्यावर मोदक बनवले की बाप्पांसाठी झटपट नैवेद्य तयार होतो.

९. पनीर मोदक थोडे हटके मोदक हवे असल्यास पनीर मोदक जरूर करून पाहा. पनीर किसून त्यात गुळाची पावडर व वेलची घालून हलकेसे शिजवून घ्या. हे सारण तांदळाच्या पिठाच्या आवरणात भरून मोदक बनवले की एक नवीन चव अनुभवायला मिळते.

१०. चणा डाळीचे मोदक तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध असलेले हे मोदक पौष्टिक आणि भरपेट असतात. रात्रभर भिजवलेली चणा डाळ शिजवून बारीक करून घ्या. त्यात गूळ आणि नारळाचा किस घालून तुपात परता. हे सारण तांदळाच्या पिठाच्या आवरणात भरले की खास दक्षिणी चवीचे मोदक तयार होतात.

Comments
Add Comment