Monday, August 25, 2025

ST Employees Salary: बाप्पा पावले! एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळणार

ST Employees Salary: बाप्पा पावले! एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळणार

मुंबई: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा पगार गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

ही आनंद वार्ता देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, "एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ तारखेपासून १० तारखेच्या दरम्यान होत असतो. परंतु यंदा गणपती उत्सव हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आल्याने केवळ वेतनामुळे त्यांचे उत्सवाच्या आनंदावर विरजण पडू नये! म्हणून राज्य सरकारला एसटीच्या विविध सवलती पोटीची प्रतिपुर्ती रक्कम लवकर देण्याची विनंती केली. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, लवकरच एसटीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बॅक खात्यांवर त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा होईल!"

आपले सण-उत्सव साजरे न करता सर्वसामान्य प्रवासी जनतेसाठी अहोरात्र राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना यंदाचा गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा हीच सदिच्छा. असे देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढे म्हणत एसटीच्या सर्व अधिकारि व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

एसटी महामंडळाला ४७७ कोटी रुपये वर्ग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला जुलै महिन्याच्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी ४७७.२५ कोटी रुपये देण्यास मान्यता देण्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळं एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला असून, गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच उद्या २६ ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांचा पगार खात्यात जमा होईल.

सरकारी कर्मचाऱ्यांनाही बाप्पा पावला

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार असल्याचं जाहीर केलं आहे. अजित पवार यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट केली आहे. अजित पवार म्हणाले,गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तमाम सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्ती वेतन हे उद्या, अर्थात २६ ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >