Monday, August 25, 2025

'प्रहार' विशेष: एसआयपीत रेकॉर्डब्रेक गुंतवणूक आणखी एक पाऊल विकसित भारताकडे

'प्रहार' विशेष: एसआयपीत रेकॉर्डब्रेक गुंतवणूक आणखी एक पाऊल विकसित भारताकडे

मोहित सोमण

एक काळ होता नागरिक शेअर बाजारात गुंतवणूक करायला कचरत असत. पण एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात गोष्टी बदलत गेल्या. आज २०२५ मध्ये गुंतवणूकदार जागृत आहेत ही मोठी बाब आहे. आज आपण विकसित भारताकडे मार्गक्रमण करत आहोत. यासाठी सरकारने लोकांमध्ये बचतीसह गुंतवणूकीची प्रवृत्ती रूजावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत ग्राहकांचा कलही वाढत आहे. महिलाही म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मागे नाहीत. चांगला नफा, चांगला परतावा कोणाला नकोय? त्यामुळे एसआयपीकडे लोकांचा झुकला जाणारा कल पाहता म्युच्युअल फंड उद्योग मोठ्या प्रमाणात फुलला आहे. त्याचा सबळ पुरावा म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणूकीत विशेषतः एसआयपीत प्रचंड वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार जुलै महिन्यात एसआयपी गुंतवणूक २८४६४ कोटींवर पोहोचली आहे. जून महिन्यात २७२६९ कोटींवरून ही वाढ जवळपास ४% नोंदवली गेली आहे. एकाच महिन्यात चार टक्के वाढ ही खेळत्या भांडवलासाठी स्वागतार्ह बाब आहे. विशेषतः जागतिक पातळीवरील अस्थिरतेच्या स्थितीतही ही वाढ भारतीय गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील समज प्रतिबिंबित करत आहे. त्यामुळे सहाजिकच सगळ्यांचा मनात प्रश्न उपस्थित असेल एसआयपी गुंतवणूकीचे भविष्य काय त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी हा लेख प्रप्रंच..

एसआयपी (Systematic Investment Plan) म्हणजे मराठीत पद्धतशीर गुंतवणूक योजना. शेअर व भांडवली बाजारातील बदलत्या समीकरणाचे फायदे तोटे आहेत. त्यातून आपल्या गरजा बघता आपल्या दृष्टीने काय योग्य आहे याचा विचार करुन एसआयपीत गुंतवणूक फायदेशीर ठरते. यापूर्वीही तज्ञांनी अनेक वेळा संतुलित एसआयपीतील गुंतवणूक करणे फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. केवळ पोस्ट अथवा एफडीपेक्षा अधिक परतावा मिळेल या एकाच उद्देशाने एसआयपीत गुंतवणूक करत असाल तर स्पष्टच सांगायचे झाले तर ते योग्य ठरणार नाही. विशेष उद्देशाने केलेली गुंतवणूक मात्र एसआयपीत फायदेशीर ठरू शकते. आपल्या घरगुती गरजा, मुलांचे शिक्षण, इतर आर्थिक गरजा, मुलांचे विवाह, जन्म, मृत्यू, इतर आजारपणे यावेळी ही अतिरिक्त गुंतवणूक कामी येते. अशातच ठराविक काळासाठी असलेली गुंतवणूक पाहता त्यातून योग्य पद्धतीने लेवरेज (फायदा) घेणे आवश्यक आहे. एसआयपी माध्यमातून ते सहज शक्य आहे. नियामक मंडळ सेबीने आपली नियमावलीही कडक केल्याने बाजारातील पारदर्शकता आता वाढली. आता लेवरेज घेण्यासाठी चांगला फंड मॅनेजर असण गरजेचे आहे. केवळ फंड मॅनेजर नाही तर योग्य योजना निवडणेही गरजेचे आहे. सध्या विविध खाजगी वित्तीय संस्थाचे एस आयपी म्युच्युअल फंड पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्यातही बँकिग फंड, डिफेन्स फंड, मिडकॅप, स्मॉलकॅप, लार्जकॅप, फ्लेक्सीकॅप, बँलन्स फंड, रिअल्टी फंड हेल्थकेअर, हाय रिस्क फंड, लो रिस्क फंड, क्वालिटी फ्लेक्सी फंड असे विविध प्रकारचे फंड बाजारात उपलब्ध आहेत.

कुठल्या सेक्टरमध्ये गुंतवणूक आपल्याला व फंड मॅनेजरला योग्य वाटते तो पर्याय आपण निवडू शकतो. रिस्क नाही असा फंड नाही त्यामुळे मार्केट लिंक रिस्क तुम्हाला एसआयपीत गुंतवणूक करताना ग्राह्य धरावीच लागते त्याशिवाय गुंतवणूक परतावाही शक्य नाही. एस आयपी साधारणतः दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून केली जाते. त्यामुळे गुंतवणूक करताना तज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक केल्यास लाभदायक ठरेल.

आता नक्की एसआयपीचे कुठले प्रकार आहेत ते समजून घेऊयात. साधारणतः एसआयपीत दोन प्रकार आहेत. प्रथम लंपसम दुसरी मंथली म्हणजेच आपण बाजारात एकरकमी पैसे गूंतवू शकतो अथवा दरमहा ठराविक रक्कमही भरण्याचा पर्याय बाजारात उपलब्ध आहे. आपल्या गरजा,उद्दिष्टे, बाजारातील परिस्थितीची सांगड घालताना त्यातील गुंतवणूक किफायतशीर नफा भविष्यात देते. उदाहरणार्थ तुम्हाला भविष्यातील एक मोठ्या खर्चिक कारणांची चाहूल लागल्यास तो एक रकमी पैसा देता यावा यासाठी गुंतवणूक केल्यास लंमसम (एकाच वेळी मोठी रक्कम) गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. मात्र भविष्यात दरमहा गुंतवणूक सुरु ठेवल्यास फायदा पुनर्रचित होऊन जोपर्यत पैसै काढत नाही तोपर्यंत गुंतवणूक ठेवल्यास एकूण बाजारातील संचित फायदा (Yield) आपल्याला मिळू शकतो. बहुतांश तज्ञ एकूण ठराविक रक्कम टाकण्यापेक्षाही दरमहा गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. परंतु निर्णय सर्वस्वी गुंतवणूकदारांचा असतो. आपली गरज ओळखून तशी गुंतवणूक करणे अपेक्षित असते.

आता गुंतवणूकीसाठी आपण उदाहरणही पाहूयात समजा तुम्ही दरमहा दोन लाख रूपये एसआयपीत ठेवले तर मिळणारी रक्कम ही एकूण युनिट्सवर आधारित रक्कम आपणास परतावा म्हणून देईल ज्याला सामान्यतः कॉर्पस गुंतवणूक फंड म्हणतात. जर आपण दोन लाख २० वर्षासाठी भरले तर मिळणारी रक्कम ही एकूण खरेदी केलेल्या युनिट्सवर आधारित असते. म्हणजेच एनएव्ही (Net Asset Value) आधारित असते. उदाहरणार्थ तुम्ही ३०००० रूपयांची गुंतवणूक केली त्यात उपलब्ध असलेल्या ५००० युनिट्स (शेअर) खरेदी केल्यास ज्या दिवशी गुंतवणूक करता त्यात घेतलेले युनिट्स त्यावर मिळणारा परतावा (खर्च व डेट म्हणजेच नुकसान वगळता) मिळणारा निव्वळ परतावा म्हणजे एनएव्ही म्हणून ओळखला जातो. एनएव्ही मोजमापाची पद्धत म्हणजे बाजारातील आपली एकूण गुंतवणूक मालमत्ता - एकूण बाकी दायित्व (Liabilities) भागिले‌ एकूण थकबाकी युनिट्स (Outstanding Units) यातून आपल्याला दरदिवशी आपल्याला सध्या मिळत असलेला परतावा निर्दशनास येतो. ज्या दिवशी गुंतवणूकदार गुंतवणूक काढतो त्यावेळी ठरलेल्या हिशोबाने गुंतवणूकदारांना परतावा मिळतो. दरमहा गुंतवणूकीची पद्धत सारखी आहे मात्र दरमहा एसआयपी गुंतवणूक करताना 'रूपी कॉस्ट अँव्हरेजिंग (RCA) अतिरिक्त फायदा होतो. जे गुंतवणूकदार ठराविक भविष्यकालीन गुंतवणूक करण्यास इच्छुक नाही अशांसाठी दरमहा एसआयपी चांगला पर्याय आहे. किंबहुना आपल्या निवृत्तीनंतर मोठा फायदा उचलण्यासाठी हा प्रकार आधिक फायदेशीर ठरू शकतो. या पद्धतीत मोठा परतावा मिळवण्यासाठी रूपी कॉस्ट अँव्हरेजिंग पद्धत बाजारात प्रचलित आहे. बाजारातील जोखमी फायदे सातत्याने बदलत असतात. अशा वेळी बाजार घसरल्यास अधिक युनिट्सची खरेदी आपले फंड मॅनेजर करतात आणि बाजार आपल्या नव्या उच्चांकावर पोहोचला असताना मात्र कमी युनिट्स खरेदी केली जातात. तयाणा फायदा असा होतो की या पद्धतीत अंतिम युनिट्समध्ये २० ते ३० वर्षांनी अधिक परतावा मिळतो तुलनेने जो एकरकमी गुंतवणूकीतील २० ते ३० वर्षाच्या कालावधीनंतर मिळतो. दोन्ही प्रकारात जोखमी आहेत व फायदेही आहेत. आपल्या पद्धतीने शंकाचे निरसन करत गुंतवणूक करावी अशी धारणा आहे. आता बाजारातील जोखमी जाणून घेण्यापूर्वी सध्याची बाजारातील परिस्थितीवर भाष्य करुयात.

सरकारकडून एसआयपी गुंतवणूकीत प्रोत्साहन मिळत आहे. आर्थिक समावेशनाचा व्यापक कार्यक्रम सेबीने हाती घेतल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या वादळानंतरही घरगुती गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवली आहे. बाजारातील जोखमी पाहता परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) पैसे काढत असताना नुकसान नियंत्रित करण्यासाठी आपल्याच देशातील गुंतवणूकदार मदत करत आहेत हे बाजारातील सकारात्मकतेचे चित्र आहे. अशाच पद्धतीने या पूर्वीही एकेकाळी नगण्य असलेला बाजार मोठ्या आकाराने पसरतच आहे. सीडीएसएल व एनएसडीएल या डिपॉझिटरीच्या अधिकृत माहितीनुसार, ऑगस्ट २०२२ मध्ये एसआयपी गुंतवणूक १०.०५ हजार कोटी होती ती जुलै महिन्यात २०.२१ हजार कोटींवर पोहोचली आहे. आपण एसआयपी गुंतवणूकीत बांगलादेश, रशिया, मेक्सिको, जपान यांनाही मागे टाकले आहे. तीन वर्षांत जवळपास एसआयपी गुंतवणूकीत वाढ होत आहे. याचाच अर्थ बाजारातील विश्वासार्हता वाढत आहे. लोकांना चांगला परतावाही मिळत आहे.

आता जोखमीही पाहूयात... अनेकांना झटपट परतावा हवा असतो. मात्र वस्तुस्थितीत इक्विटी एसआयपी बाजारातील गुंतवणूक अस्थिरतेत बदलू शकते आणि ते जास्त जोखीमही देऊ शकतात, त्यातल्या त्यात डेट एसआयपी कमी परतावा देऊन तुलनेने सुरक्षित असतात. तथापि, एसआयपी रुपयाच्या किमतीच्या सरासरी आणि चक्रवाढीद्वारे जोखीम कमी करतात, ज्यामुळे ते दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी योग्य बनतात. असे असताना अनेक गुंतवणूकदारांना अवास्तव नफ्याची अपेक्षा असते. त्यामुळे नैराश्य येऊ शकते. त्यामुळे बाजारात संयमही आवश्यक आहे. बाजारातील परिस्थिती एसआयपी परताव्यावर परिणाम करते आणि भूतकाळातील ट्रेंड अंतर्दृष्टी देतात, परंतु ते भविष्यातील नफ्याची खात्री देत नाहीत. तथापि, एसआयपींनी आजपर्यंत इतिहास पाहिल्यास सामान्यतः दीर्घ कालावधीत चांगली कामगिरी केली आहे. मात्र चढउतारही (Volatility) देखील असते.

अनेकदा एसआयपीमध्ये एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी नियमितपणे लहान रकमेची गुंतवणूक केली जाते, एसआयपीमध्ये तोटा होण्याचा धोका एसआयपी गुंतवलेल्या म्युच्युअल फंडाच्या कामगिरीवर अवलंबून असतो. एसआ यपी बाजारातील अस्थिरता कमी करू शकतात, परंतु जर फंडाच्या अंतर्निहित गुंतवणुकीची (Underlying )कामगिरी खराब झाली तर नकारात्मक परतावा मिळू शकतो. अशावेळी पैशाची अत्यावश्यक चणचण वाढल्यास अथवा काही कारणांमुळे गुंतवणूक काढायची झाल्यास ती एसआयपीत शक्य आहे. ती गुंतवणूक योग्य वेळी काढणे महत्वाचे आहे.

भारतात एकीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढवली असली तरी सध्या त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये विशिष्ट स्टॉक खरेदी करणे सुरू आहे. अशावेळी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी संभाव्य कुठले सेक्टर चांगले राहिल भारतातील अर्थव्यवस्थेत काय बदल होतील यावर ही गुंतवणूक करणे आवश्यक आहे जे भविष्यात फायदा देईल. त्यासाठी खात्रीलायक फंड मॅनेजरची गरज आहे. उपलब्ध असलेल्या एसआयपीतील गुंतवणूक पँटर्नचा अभ्यास केल्यास योग्य फंड आपल्यासाठी कुठला ते कळते आणि विशेषतः परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार बाजारातील गुंतवणूक सध्या काढत असल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी बाजारातील नुकसान कमी करण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. असे असताना मात्र योग्य गुंतवणूक करणे अनिवार्य असणार आहे. दरम्यान भारतातील एस आयपी गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत असताना सेबी अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी म्युच्युअल फंडात स्त्रियांनी गुंतवणूक केल्यास त्यांना इन्सेंटिव देणार असल्याचं घोषित केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्त्रीया गुंतवणूकीत सहभाग घेऊ शकतात. समाजातील सगळ्याच प्रवर्गात लोकांनी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी एसआयपी गुंतवणूकीत वाजवी गुंतवणूक करावी. देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी भांडवली बाजाराचा मोठा सहभाग असतो. तो शाबूत ठेवण्यासाठी अनेकांनी केलेली पुढील पीढीला लाभदायक ठरेलच मात्र एसआयपीतील गुंतवणूक विकसित भारतासाठी आणखी एक पुढचे पाऊल ठरेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा