
मुंबई: बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. चार दिवस पावसाने मुंबईत विश्रांती घेतली होती. मात्र पावसाने मुंबई तसेच उपनगरात पुन्हा एकदा जोर धरला आहे.
सोमवारी पहाटेपासूनच पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. या पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर पाहायला मिळत आहे. वाहनांचा वेग यामुळे कमी झाला आहे. मुंबईच्या लोकल वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वे ५ ते ७ मिनिटे उशिराने सुरू आहेत तर हार्बर रेल्वे ५ मिनिटे उशिराने आणि पश्चिम रेल्वे मार्गावरही ५ मिनिटे उशिराने रेल्वे सुरू आहेत.
मंगळवारी आणि बुधवारी मुंबईसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम उपनगरात पहाटेपासूनच पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. पश्चिम उपनगरामध्ये जोगेश्वरी, अंधेरी, मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, दहिसर, सांताक्रुझ, वांद्रे, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे.