Monday, August 25, 2025

Mumbai Nanded Vande Bharat : मुंबई-जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणार, जाणून घ्या वेळापत्रक, थांबे अन् तिकीटदर

Mumbai Nanded Vande Bharat : मुंबई-जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणार, जाणून घ्या वेळापत्रक, थांबे अन् तिकीटदर

मुंबई : मुंबई आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली मागणी अखेर फळाला आली आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार थेट नांदेडपर्यंत करण्यात आला आहे. आधी ही हाय-स्पीड वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन जालना ते मुंबई या मार्गावर धावत होती. तीही आठवड्यातील सहा दिवस (बुधवार सोडून) प्रवाशांसाठी उपलब्ध होती. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, २६ ऑगस्टपासून ही गाडी नांदेडपर्यंत धावणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे परभणी आणि नांदेडच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस नांदेड ते मुंबईदरम्यानचे ६१० किमी अंतर अवघ्या ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करेल. या निर्णयामुळे मराठवाड्यातील प्रवाशांच्या प्रवासात अधिक सोय, वेग आणि आरामाची भर पडणार आहे.

कसा असेल शेड्यूल?

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई येथून ही वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी १.१० वाजता सुटणार आहे आणि रात्री १०.५० वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे. मंगळवारी लोकार्पण सोहळा झाल्यानंतर गुरुवारपासून ही गाडी नियमित धावणार आहे. त्यानुसार, दररोज सकाळी ५ वाजता एच.एस. नांदेड रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्स्प्रेस सुटेल आणि दुपारी २.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून, नांदेड ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या सव्वा तीन तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार असून, सोयी आणि वेगामुळे वंदे भारत एक्स्प्रेस हा मार्गावरील प्रवासाचा पहिला पसंतीचा पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई ते नांदेड वंदे भारतचे थांबे

  • मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
  • दादर
  • ठाणे
  • कल्याण
  • नाशिक रोड
  • मनमाड
  • औरंगाबाद
  • जालना
  •  परभणी
  •  नांदेड

मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आधुनिक आणि वेगवान रेल्वेसेवेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मुंबई – नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसमुळे आता प्रवाशांना जलद, आरामदायक आणि अत्याधुनिक रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. या गाडीचा परतीचा प्रवास दररोज पहाटे ५ वाजता नांदेडहून सुरू होऊन दुपारी २.२५ वाजता मुंबईला पोहोचणार आहे. त्यामुळे रोजंदारी प्रवाशांसह व्यावसायिक व कामकाजाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांना मोठी सोय होणार आहे.

मुंबई ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस तिकीट

एसी चेअर कारचे तिकीट १,७५० रुपये

एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट ३,३०० रुपये ठरविण्यात आले आहे.

रेल्वेच्या या नव्या निर्णयामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण आणखी बळकट होणार आहे. विशेषतः परभणी आणि नांदेडकरांना याचा मोठा फायदा होईल. आतापर्यंत या भागातील प्रवासी या आधुनिक व वेगवान सेवेपासून वंचित होते, मात्र आता ते थेट मुंबईशी वेगवान वंदे भारतने जोडले जाणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >