Sunday, August 24, 2025

बेस्ट निवडणुकीतून संदेश

बेस्ट निवडणुकीतून संदेश

मुंबई . कॉम

मागील आठवड्यातच राजकीय धामधुमीत एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. बेस्ट उपक्रमातील कर्मचारी पतपेढीची निवडणूक नुकतीच पार पडली आणि त्या निवडणुकीचा निकाल हा धक्कादायक ठरला. सर्वजण अचंबित झाले. अचंबित म्हणण्यापेक्षा निकाल धक्कादायक असल्याने संपूर्ण राजकारणच ढवळून निघाले तसे पाहता या निकालावर एवढी चर्चा आवश्यकही नव्हती आणि त्याची गरजही नव्हती मात्र कुस्तीच्या आखाड्यात जसा एक कुस्तीगीर येतो आणि आता आपणच जिंकणाऱ्या या आवेशात शड्डू ठोकतो मात्र समोरच्याला हलक्यात घेतल्याने त्याचे जे काही पानिपत होते आणि तो ती कुस्ती हरतो आणि सर्वांना अचंबित करतो असाच काहीसा प्रकार गेल्या आठवड्यात घडला.

निमित्त ठरले ते बेस्ट एम्प्लोयीजच्या पतपेढीच्या निवडणुकीचे. कारण या निवडणुकीत दोन महारथी उतरले मात्र त्याच्यात तिसऱ्याचाच लाभ झाला. यात उबाठा गटाचा संपूर्ण सुपडा साफ झाला, तर भाजपच्या प्रसाद लाड गटाला जेमतेम आठ जागा मिळू शकल्या. त्यात त्यांचे १२ सदस्य निवडून आणून बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी जिंकत विजयश्री खेचून आणली. खरे पाहिले तर या सर्व गोष्टींचा ऊहापोह सर्वत्र करून झाला आहे. मात्र तरी काही गोष्टी या बाकी राहतातच. उबाठा गट व भाजपने पूर्ण ताकद या निवडणुकीत लावली होती. त्यात मनसेची साथ मात्र एकाचा सुपडा साफ दुसऱ्याला जेमतेम विजय मिळवता आला. त्यामानाने जिंकू किंवा हरू काहीतरी होईल पण एकटे लढू या आत्मविश्वासात लढणाऱ्या शशांक राव यांनी मोठ्या आत्मविश्वासाने या लढतीत उतरत बाजी मारली त्यांचे खरोखरच अभिनंदन.

आपल्या वडिलांच्या म्हणजेच शरद राव यांची पुण्याई त्यांच्या कामी आली व शशांकराव यांचा सध्या असलेला बेस्टमधील कामाचा उरक पाहता त्यांना मते मिळणे तेही काहीही जास्त धडपड न करता ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचारी पतपेढीची निवडणूक आगामी महानगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून चर्चेत आली, नव्हे तर ती आणली गेली कारण राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या वरळी येथील मनोमिलनानंतर ही पहिलीच निवडणूक ही दोघं एकत्र लढवणार होते त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. तसे पाहता बेस्टमध्ये पतपेढीतील कर्मचाऱ्यांची संख्या १५ हजारच्या आसपास तर एकेकाळी याच पतपेढीची सभासद सदस्य संख्या ४२ हजारच्या आसपास होती. मात्र जसजसे बेस्टमधील कर्मचारी कमी होऊ लागले व बेस्टमध्ये खासगीकरणाचे वारे वाहू लागले त्यामुळे ही संख्या कमी कमी होत गेली. त्यात सात वर्षे या पतपेढीवर निरंतर म्हणजेच आताची उबाठा यांची निरंतर सत्ता होती. मात्र मध्यंतरीच्या काळात या पतपेढीतील गैरव्यवहार वाढू लागले.

आपल्याच कर्मचाऱ्यांना जास्त दराने कर्ज वाटप करणे तसेच लोणावळा येथे पतसंस्थेने घेतलेली विश्रामगृहे आणि बारा कोटी रुपयांच्या व्यवहाराविषयी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशीची चक्रे फिरली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा या पतपेढीवर विश्वास उडाला होता. जेमतेम १५०००पैकी ८२ टक्के लोकांनी मतदान केले. ज्या सोमवारी मतदान झाले त्या दिवशी मुंबईत वरुण राजाचीही तुफान बॅटिंग चालू होती. मात्र अशा परिस्थितीतही ८२ टक्के मतदान होणे म्हणजे एकप्रकारे सत्तापालटीची चाहूल लागली होती. या निवडणुकीत शिवसेना उबाठा व मनसेला आपला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही त्याचीच परिणीतीत म्हणून अखेर गुरुवारी शिवसेना बेस्ट कामगार सेनेचे शिलेदार सुहास सामंत यांना यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला.

वास्तविक सुहास सामंत यांची बरीच वर्ष बेस्टमध्ये आपली निरंतर सत्ता होती. त्यात अनेक वर्ष बेस्ट समिती सदस्यापासून युनियनचे नेतृत्वही त्यांनी केले होते. कर्मचारी वर्गही त्यांना मानणारा होता. त्यादरम्यान मध्यंतरी त्यांचेच एक साथीदार सुनील गणाचार्य यांनी त्यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि सुहास सामंत एकटे पडले. अशातही त्यांनी जोमाने बेस्टमध्ये आपली वाटचाल सुरू ठेवली. मात्र तोपर्यंत बेस्टच अशा परिस्थितीत आली की कोणी कल्पनाही केली नसेल. बेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात खासगीकरणाचे वारे वाहू लागले. त्यात बेस्टच्या स्वमालकीच्या बस गाड्या जाऊन कंत्राटदारांच्या बस आल्या. निरनिराळे कंत्राटदार बेस्टमध्ये वावरू लागली. त्यात बसचालकापासून बसवाहकही कंत्राटदाराचा झाला. त्यामुळे बेस्टचा मूळ कर्मचारीत असुरक्षित रूपात वावरू लागला लागला.

कारण खासगीकरणाच्या वाटेत बेस्टच्या बस सेवा व विद्युत पुरवठा विभागालाही त्याचा फटका बसू लागला. त्यात एक मोठा कालावधी झाला पण अजूनही बेस्ट कर्मचाऱ्यांना वेतन करार झालेला नाही. त्यात मुंबई महापालिकेने आदेश दिल्याने बेस्ट उपक्रमाने बस भाडे कमी केले आणि त्याची उर्वरित रक्कम मुंबई महानगरपालिकेने ठरले होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने बेस्टची अशी अवस्था करून टाकली की दर महिन्याला बेस्ट अधिकारी आपली रिकामी झोळी घेऊन महापालिकेच्या दरवाज्यात लाचार होऊन मदत मागण्यास प्रवृत्त झाले. दुसरी गोष्ट म्हणजे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची. आजही निवृत्त झाल्यानंतर आपल्याच पैशासाठी जो संघर्ष करावा लागत आहे व आपल्यालाही तसा भविष्यात संघर्ष करावा लागणार आहे. यामुळे बेस्ट कर्मचारी अजूनच असुरक्षित बनला. ही गोष्ट कर्मचाऱ्यांना आतून पोखरत होती.

वास्तविक पाहता मुंबई महानगरपालिकेची चावी त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे होती. मात्र त्यांनी बेस्टकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. कोविड भत्ता मुंबई महानगरपालिकेने बेस्टकडे वर्ग केला असतानाही कोविड भत्ता न देणे. तसेच कोविड काळात बेस्ट कर्मचाऱ्यांकडे केलेले दुर्लक्ष त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात बेस्ट कर्मचाऱ्यांना आपला प्राण गमवावा लागले. त्यात निवडणुकीच्या अगोदर हा कोविड भत्ता प्रसाद लाड यांच्या मदतीने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला.

मात्र याचे सारे श्रेय प्रसाद लाड घेऊन गेले आणि म्हणूनच बेस्टची झालेली वाताहात कर्मचारी आपल्या उघड डोळ्यांनी बघत असताना आता त्याच उबाठा गटाला पुन्हा निवडून देणे म्हणजे पुन्हा आपण दुर्दशेला आपणच कारणीभूत होणे असे ठरणार होते आणि त्यांनी अक्षरश: उबाठा व मनसेचा सुपडा साफ करून टाकला. त्यात भाजपलाही वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे याचा फटका बसला. भाजपच्या पॅनलमध्ये नारायण राणे प्रणित समर्थ कामगार संघटनाही होती, म्हणजे तीही भाजपचीच. त्यात शरद राव यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या संघटनेमधूनच फुटून दोन सदस्यांनी सुनील गणाचार्य यांना हाताशी धरून आणखी एक नवे पॅनल उभे केले तेही भाजपचेच.

त्यामुळे भाजपचीच मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली व त्याचा फटका हा भाजप प्रणित संघटनांना बसला. त्यात काही पक्षांची व सदस्यांची तर मोठ्या प्रमाणात विभागणी झाली. मात्र हे नसे थोडके...ज्या भ्रष्टाचारी उबाठा गटाला नामशेष हेच प्रमुख उद्दिष्ट ठरवले होते त्यात कोणाचे तरी बळी जाणारच. भाजपने एवढी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली नसेल एवढी मनसे ने केली. काही नेते तर राणा भीम देवीच्या थाटात मोठमोठ्या वल्गना करू लागले होते.

आता आपणच जनतेचे तारणहार आता दुसऱ्यांचा नामशेष होणार मराठी माणूस एकत्र आला आहे. तो आम्हालाच मतदान करणार या आत्मविश्वासात मनसे व उबाठा दंग राहिली. त्यांनी हे विसरता कामा नये की या निवडणुकीत सुद्धा मराठी मतदारच होते आणि त्यांना मतदारांनी पूर्णपणे नाकारले आहे. जेवढ्या लवकर ते हे सत्य स्वीकारतील तेवढे अतिआत्मविश्वासातून बाहेर येतील. हे ही खरे आहे की या निवडणुकीचा आणि मुंबई महानगरपालिकेच्या काहीही संबंध नाही. आताची गणिते वेगळी होती तर तेव्हाची गणिते वेगळे असतील. मात्र या निवडणुकीचा बोध हा सर्वांनीच आतापासूनच घेतला पाहिजे. कारण मतदारांना कोणीही गृहीत धरू नये हाच एक संदेश या निवडणुकांबद्दल मिळतो. हेही खरच...! - अल्पेश म्हात्रे

Comments
Add Comment