
मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन, ज्याला 'महाराष्ट्रीय भाऊ' म्हणून ओळखले जाते, त्या प्रणित मोरेने 'बिग बॉस 19'च्या घरात दणक्यात एन्ट्री घेतली आहे. तो या सीझनमधील अकरावा सदस्य म्हणून घरात दाखल झाला. आपल्या लाडक्या 'महाराष्ट्रीय भाऊ'ला 'बिग बॉस 19'च्या मंचावर पाहिल्याने चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
प्रणित मोरे शांतपणे स्टेजवर आला, पण त्यापूर्वीच त्याने होस्ट सलमान खानलाही (Salman Khan) प्रभावित केले. प्रणित स्टेजवर येताच सलमान खान चक्क मराठीत बोलू लागला, आणि त्यानंतर दोघांमधील संवादाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. सोशल मीडियावरही प्रणितच्या चाहत्यांनी त्याला भरभरून पाठिंबा दिला.
सलमान खान आणि प्रणित मोरे यांच्यातील संवाद
प्रणित स्टेजवर आल्यावर त्याने सलमान खानला 'हॅलो सर' म्हटले. त्यावर सलमानने त्वरित मराठीत उत्तर दिले, "मला वाटलं होतं की, माझ्यावरती काहीतरी येणार..." यावर प्रणितने मिश्किलपणे उत्तर दिले, "नाही... नाही सर... आप पर मजाक उडाउंगा तो, मैं उड जाऊंगा..." हा संवाद ऐकून प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडाले.
प्रणित मोरे कोण आहे ?
प्रणित मोरे हा एक प्रसिद्ध मराठी स्टँड-अप कॉमेडियन आहे. त्याच्या विनोदी शैलीने आणि अचूक कॉमेडी टायमिंगने त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. यूट्यूब आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे व्हिडिओ खूप लोकप्रिय आहेत. काही काळापूर्वी, एका शोमध्ये अभिनेता वीर पहाडियाची खिल्ली उडवल्यामुळे त्याला मारहाण झाली होती, ज्यामुळे तो चर्चेत आला होता. या घटनेनंतर वीर पहाडियाने प्रणितची जाहीर माफी मागितली होती. 'बिग बॉस 19'च्या घरात आता त्याची कॉमेडी कशी रंगत आणते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.