Monday, August 25, 2025

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ

मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली विल्हेवाट

मुंबई (खास प्रतिनिधी) : अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अत्यंत तत्परतेने स्वच्छता मोहीम हाती घेत मुंबईतील स्वराज्यभूमी (गिरगाव), दादर, माहीम, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांचा परिसर स्वच्छ केला आहे. मागील १५ ते २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत एकूण ९५२.५ मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. सुमारे ३८० कर्मचाऱ्यांनी एकूण ६ मशिन्सच्या सहाय्याने २४ तास अथक प्रयत्न करून हे सहाही समुद्रकिनारे पूर्ववत स्वच्छ, सुंदर केले.

मंगळवारी १९ आणि बुधवारी २० ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, महानगरपालिकेच्या संबंधित विविध विभागांच्या वतीने तत्काळ विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने, पावसामुळे निर्माण झालेला कचरा संकलित करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने, मुंबईतील स्वराज्य भूमी (गिरगाव), दादर, माहीम, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरात जमा झालेला कचरा संकलित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शनिवारी २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत या समुद्रकिनाऱ्यांवरून एकूण ९५२.५ मेट्रिक टन कचरा हटविण्यात आला आहे. यासाठी ३८० स्वच्छता कर्मचारी ६ संयंत्रांच्या सहाय्याने २४ तास कार्यरत होते.

समुद्रकिनाऱ्यांवर करण्यात आलेली स्वच्छता आणि मनुष्यबळ

  • स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी – २३ मेट्रिक टन (१६ मनुष्यबळ आणि १ मशीन)
  • दादर-माहीम चौपाटी – ३०० मेट्रिक टन (४८ मनुष्यबळ आणि १ मशीन)
  • वेसावे चौपाटी – २०० मेट्रिक टन (१२० मनुष्यबळ आणि १ मशीन)
  • जुहू चौपाटी – ३७५ मेट्रिक टन (१५० मनुष्यबळ आणि १ मशीन)
  • मढ-मार्वे चौपाटी – ३४.५ मेट्रिक टन (३५ मनुष्यबळ आणि १ मशीन)
  • गोराई चौपाटी – २० मेट्रिक टन (१४ मनुष्यबळ आणि १ मशिन)
Comments
Add Comment