
पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून बेपत्ता झालेला २४ वर्षांचा गौतम गायकवाड जिवंत आहे. गौतम २० ऑगस्ट रोजी सिंहगडावरुन बेपत्ता झाला होता. अखेर २४ ऑगस्ट रोजी तो दरीत जिवंत अवस्थेत आढळला. स्थानिकांनी गौतमला दरीतून वर आणले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.
सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सीसीटीव्हीमधून एक तरुण पळत आणि लपून जात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे गौतम हा कड्यावरून पडला की त्याने स्वतःहून हा बनाव रचवला या संदर्भात पोलीस तपास करत होते.
गौतम गायकवाड हा सध्या हैदराबाद येथे राहत असून तो मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा आहे. हैदराबाद येथून गौतमसह महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे , सूरज माळी असे पाच जण सिंहगड फिरण्यासाठी गेले होते. ते बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता सिंहगडावर पोहोचले. संध्याकाळी लघुशंका करून येतो असे सांगून गौतम तानाजी कडाच्या दिशेने गेला. नंतर गौतम बेपत्ता झाला, त्याच्याशी कोणाचाही संपर्क होत नव्हता. मित्रांनी शोध घेतला त्यावेळी कड्यावर एका ठिकाणी गौतमची चप्पल दिसली आणि पण गौतम तिथे नव्हता. अखेर पावणेआठ वाजता गौतमच्या मित्रांनी १०० क्रमांकावर कॉल करुन पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी हवेली आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने गौतमचा शोध सुरू केला. पण गौतम सापडला नव्हता. अखेर २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास स्थानिकांना दरीच्या एका भागात हालचाल जाणवली. तातडीने शोध घेतल्यावर गौतम जिवंत अवस्थेत आढळल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्थानिकांनीच गौतमला गडावरील वाहनतळावर नेले. तिथून गौतमला रुग्णालयात नेण्यात आले.