
मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिक मासळी बाजाराची स्थिती सुधारण्यासाठी हा नवा मासळी बाजार उभारण्याची योजना आहे. प्रस्तावीत मासळी बाजार हा देशातील सर्वाधिक आधुनिक असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाच मजली मासळी बाजार असेल.
जे. बी. नगर येथील जवळपास सहा हजार चौरस मीटर भूखंडावर मासळी बाजार उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे. या जागेवर सध्या एक स्थानिक मासळी बाजार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या दोन किलोमीटरवर ही जागा असून मेट्रो स्थानकही येथून जवळ आहे. या बाजाराची इमारत पर्यावरणपूरक असेल; ज्यात कमीत कमी कचऱ्याची निर्मिती होणार आहे. तसेच, पाण्याचा पुनर्वापर आणि सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करण्यात येणार आहे.
प्रस्तावीत मासळी बाजारात पारंपरिक कोळी संस्कृतीची अनुभूती देणारे एक रेस्टॉरन्ट आणि एक संग्रहालय यांचेही नियोजन आहे. या मासळी बाजारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 'एआय'ची मदत घेतली जाईल. भूमिगत कचराकुंड्या आणि स्मार्ट सेन्सर आदींचा वापर करण्यात येणार आहे. विजेबाबत इमारत स्वयंपूर्ण असावी यासाठी सौरऊर्जा पॅनलचा अंतर्भावही इमारतीत करण्यात येणार आहे. अंधेरीच्या पाच मजली मासळी बाजारात सुक्या माशांचा बाजार, संग्रहालय, कोल्ड स्टोरेज, कोळी भवन, समाज सभागृह रेस्टॉरन्ट, प्रशिक्षण केंद्र आणि पार्किंग स्पेस (वाहनतळ) या प्रमुख सोयीसुविधा असतील.