Monday, August 25, 2025

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे
मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर थेट बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचा मोठा फटका देशातील आघाडीच्या फॅन्टसी गेमिंग कंपनी ड्रीम११ (Dream११) ला बसला आहे. कायद्याच्या अंमलबजावणीनंतर ड्रीम११ ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कळवले आहे की, ते पुढे भारतीय संघाचे स्पॉन्सर राहू शकणार नाहीत. त्यामुळे आशिया कप सुरू होण्याच्या अवघ्या दोन आठवडे आधीच टीम इंडियाला नव्या स्पॉन्सरच्या शोधाला लागावे लागणार आहे. ड्रीम११च्या या माघारीमुळे BCCI ला मोठा आर्थिक फटका बसणार असून, तब्बल ११९ कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे समजते. त्यामुळे आगामी स्पर्धांच्या तोंडावर बोर्डाला तातडीने नवा प्रायोजक शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

ड्रीम११ची अधिकृत माघार

ड्रीम११ने स्पॉन्सरशिप करारातून माघार घेतल्यानंतर ही बाब औपचारिकरित्या बीसीसीआयला कळवण्यात आली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, ड्रीम११चे प्रतिनिधी खास बीसीसीआय कार्यालयात भेट देऊन ही माहिती देऊन गेले. त्यांनी थेट सीईओ हेमांग अमीन यांना सांगितले की, कंपनी पुढे भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सुरू ठेवू शकणार नाही. या निर्णयामुळे आशिया कपदरम्यान ड्रीम११ टीम इंडियाचा स्पॉन्सर राहणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संघासाठी नवीन स्पॉन्सर शोधण्याचे मोठे आव्हान बीसीसीआयसमोर उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय लवकरच नव्या स्पॉन्सरसाठी टेंडर प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ड्रीम११वर लागणार का दंड?

ड्रीम११ने भारतीय संघाच्या स्पॉन्सरशिप करारातून माघार घेतल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रश्न उपस्थित झाला होता की, कंपनीवर बीसीसीआय दंड आकारणार का? मात्र, बीसीसीआयच्या दुसऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ड्रीम11वर कोणताही दंड आकारला जाणार नाही. करारामध्ये आधीपासूनच अशी तरतूद करण्यात आली होती की, जर कंपनीचा मुख्य व्यवसाय केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे थेट प्रभावित झाला, तर त्यांना बीसीसीआयला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. याच कारणामुळे ड्रीम११ला करार मोडल्याबद्दल दंडमुक्ती मिळाली आहे.

तीन वर्षांचा ३५८ कोटींचा करार

ड्रीम११ ही भारतातील सर्वात मोठी फँटसी गेमिंग कंपनी असून तिची स्थापना जवळपास १८ वर्षांपूर्वी झाली. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनीचं सध्याचं मूल्यांकन तब्बल ८ अब्ज डॉलर्स इतकं आहे. ऑनलाइन गेमिंगच्या जगात वेगाने झेप घेतलेल्या या कंपनीने भारतीय क्रिकेट बोर्डाशी (BCCI) मोठा करार केला होता. जुलै २०२३ मध्ये ड्रीम११ने बीसीसीआयसोबत तीन वर्षांसाठी तब्बल ३५८ कोटी रुपयांचा प्रायोजकत्व करार केला होता. या कराराअंतर्गत ड्रीम११ भारतीय संघाच्या अधिकृत जर्सी स्पॉन्सर म्हणून कार्यरत होते. याआधी ही भूमिका एडटेक कंपनी बायजूसकडे होती, मात्र त्यांच्याकडून माघार घेतल्यानंतर ड्रीम११ने हा अधिकार मिळवला होता.

धोनीपासून रोहितपर्यंत ड्रीम११चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम११ केवळ ऑनलाइन गेमिंगपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर भारतीय क्रिकेट विश्वाशीही त्याचा घट्ट संबंध आहे. कंपनीने आयपीएलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असून अनेक फ्रँचायझीसोबत त्यांचे करार आहेत. ड्रीम११च्या लोकप्रियतेत मोठा वाटा आहे तो त्याच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर्सचा. महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांसारखे भारतातील आघाडीचे क्रिकेटपटू या कंपनीचे चेहऱ्यादाखल झळकले आहेत. या दिग्गज खेळाडूंमुळे ड्रीम११ला क्रिकेटप्रेमी चाहत्यांमध्ये विशेष ओळख मिळाली. याशिवाय, २०२० मध्ये जेव्हा चायनीज कंपनी विवोने आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप सोडली, तेव्हा ड्रीम११ने हा मोठा करार स्वीकारत आयपीएलचा अधिकृत टायटल स्पॉन्सर बनण्याचा मान मिळवला. यामुळे ड्रीम11ची क्रिकेटमधील उपस्थिती अधिक मजबूत झाली.

फुटबॉल, बास्केटबॉलशीही ड्रीम११चे घट्ट नाते

ड्रीम११ केवळ क्रिकेटपुरते मर्यादित राहिलेले नाही. इतर क्रीडा प्रकारांशीही कंपनीने घट्ट नातं जोडलं आहे. भारतातील सर्वोच्च फुटबॉल स्पर्धा मानली जाणारी इंडियन सुपर लीग (ISL) मध्ये ड्रीम११ने अधिकृत फँटसी पार्टनर म्हणून आपली उपस्थिती नोंदवली होती. सध्या ही लीग अनिश्चित काळासाठी स्थगित असली तरी त्या काळात फुटबॉल चाहत्यांमध्ये ड्रीम११ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय,२०१७ साली जागतिक दर्जाच्या एनबीए (National Basketball Association) नेही ड्रीम११ प्लॅटफॉर्मवर आपला अधिकृत फँटसी गेम सुरू केला. यामुळे बास्केटबॉलप्रेमी चाहत्यांनाही या प्लॅटफॉर्मशी जोडण्यात यश आलं. फुटबॉल आणि बास्केटबॉल व्यतिरिक्त, ड्रीम११ने प्रो कबड्डी लीग आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) यांच्यासोबतही करार केले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या पलीकडे जाऊन विविध क्रीडा प्रकारांमध्ये फँटसी गेमिंगचा अनुभव देणारी ही भारतातील पहिली मोठी कंपनी ठरली आहे.
Comments
Add Comment