
वार्तापत्र : कोकण
कोकणामध्ये गणेशोत्सव, शिमगोत्सव हे सण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उत्साहाने साजरे केले जातात. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कोकणातील गावाबाहेर शहरांमध्ये असणारा कोकणवासीय गणेशोत्सव आणि शिमगोत्सव या दोन सणांच्या निमित्ताने आपल्या गावात येतात. दिवाळीच्या सणाला आपल्या गावाला येणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. मग कोकणातील ग्रामदेवतांचे उत्सव, जत्रोत्सव याला ही सर्व मंडळी गावात येतात; परंतु कोकणात सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरोघरी गणेशमूर्तीचे पूजन केले जाते.
त्यामुळेच कोकणातील इतरवेळी बंद असलेली घरे या गणेशोत्सवाच्या निमित्ताने उघडलेली दिसतात. कोकणातील प्रत्येक गावातील वातावरणात उत्साह असतो. निसर्गातील हिरवेपणा मनाला निश्चितच आल्हाददायक वाटत राहते. सगळीकडे हिरवेगार निसर्गाने एक वेगळं वातावरण तयार झालेलं असत. गणपती उत्सवात साऱ्या वेदना, दु:ख, तंटे, बखेडे विसरून कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वजण गणेशाच्या आगमनाची वाट पाहत असतात.
प्रत्येक घरात मुंबई, पुणे तसेच नोकरीनिमित्त अन्य भागांत राहिलेला प्रत्येकजण परतलेला असतो. त्यांच्या येण्याने गावात राहणारी वृद्ध आपल्या लेकरांच्या ओढीने भावनिकदृष्ट्या फार अस्वस्थ असतात. गावातील वृद्धांच्या नजरा मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांमध्ये असणाऱ्या आपल्या लेकरांच्या येण्याने आणि ज्याची वर्षभर गणपती कधी येणार म्हणून वाट पाहणारे सारेच फार उत्साही आनंदी असतात. यामुळे कोकणात गणपती उत्सवाला प्रत्येकाची पावले रेल्वे, एस. टी. किंवा स्वत:च्या वाहनानेदेखील आपल्या घरी परतलेली असतात. यावर्षीही महाराष्ट्र सरकारने कोकणात स्वत:च्या वाहनाने येणाऱ्यांना टोलमाफी केली आहे.
दीड-दोन हजार मुंबई ते कोकणप्रवासात टोल भरावा लागत होता. त्या पार्श्वभूमीवर कोकणात या गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोकणात येणारा गणेशभक्त यावर्षी देखील मुंबई-गोवा महामार्गाने सुखकर प्रवास करत येऊ शकणार नाही. मुंबई-गोवा महामार्गावर आजही रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही भागांत महामार्गाची काम अपूर्ण आहेत. मात्र, तरीही गतवर्षीपेक्षा यावर्षी अधिक चांगली स्थिती आहे.
कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास कोकणवासीय चाकरमान्यांना पुढच्यावर्षीपर्यंत तरी चांगला होईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठीची टोलमाफी २३ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांसाठी वाहनांना, एस. टी बसेसना टोलमाफी देण्यात येणार आहे. ‘गणेशोत्सव २०२५-कोकण दर्शन’ या नावाने हा पास वाहनांना देण्यात येणार आहे.
गणेशोत्सव २०२५-कोकण दर्शनचे पास प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे हे कोकण दर्शनचे पास उपलब्ध असणार आहे. कोकणातून मुंबईच्या परतीच्या प्रवासासाठीही हाच पास ग्राह्य धरला जाणार आहे. या पासविषयी मुंबईकर चाकरमानी जनतेला माहिती व्हावी यासाठी राज्यसरकारने संबंधित विभागानाही जास्तीत-जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या टोलमाफीच्या या निर्णयाने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना सोसावा लागणारा भुर्दंड आता सोसावा लागणार नाही. यामुळे निश्चितच शासनानेही कोकणातील गणेशोत्सवाचा उत्साहदेखील द्विगुणित केला आहे. असेच म्हणावे लागेल. पाऊसधारांनी धरणे तुडुंब...!
कोकणात मागील आठवडाभर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत होता. काही भागांत पाऊस सतत लागतच होता. यामुळे कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजच्या घडीला भातशेतीच जरी नुकसान झालय असं वाटत नसल तरीही त्याचे नेमकेपणाने होणारे परिणाम नजिकच्या काळात पुढे येतील. बऱ्याच गावातून ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत होता. यामुळे साहजिकच ओहोळ, नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली.
सिंधुदुर्गात तर काही नद्यांचे गाळ काढण्यात आल्याने साहजिकच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळूनही गावातून पाणी भरण्याचे प्रकार फार ठिकाणी घडले नाही. दरवर्षी ज्या भागातून पाणी भरते त्या भागातही या पावसाच्या पाण्याचा परिणाम जाणवला नाही. कोकणातील कुंडलीका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, जगबुडी, नद्यांनी यावेळी इशारा पातळी ओलांडली आहे. कोकणात एकूण १७३ लहान-मोठी धरणे आहेत. या धरणांमध्ये ११८.९३ टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे.
ही सर्व धरणेही ९२ टक्के इतकी पाण्याने भरली आहेत. अलीकडे हवामान खात्याचे अंदाज बहुतांशीवेळा अचूक येत आहेत. यामुळे कोणत्या भागात पाऊस पडणार आहे याची माहिती ग्रामस्थांना होते त्यामुळे शहरी भागातील नागरीक व ग्रामस्थही सतर्क असतात. काळजी घेतात. गत आठवडाभर कोसळणारा पाऊस आणि अगदी दोन दिवसांवर येणारा गणपती उत्सव यामुळे या कोसळणाऱ्या पावसातच गणेशोत्सव साजरा करावा लागणार की पाऊस थोडीफार विश्रांती घेईल याच्या ‘गजाली’ मात्र मालवणी मुलखात होऊ लागल्या आहेत.
कोकण रेल्वेची कार रो-रो आली...! कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासीयांना कोकण रेल्वेने कोलाड ते नांदगाव ता. कणकवली, वेर्णा गोवा अशी कार रो-रो सेवा सुरू केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर पहिली कार रो-रो सेवा शनिवारी २३ ऑगस्टला कोलाड येथून कोकणात रवाना झाली. रविवारी सकाळी नांदगाव रेल्वे स्टेशनवर कार आणि प्रवासी उतरले. आपल्या कारने आपल्या गावी गणपतीला पोहोचलेही.
कोकण रेल्वेच्या या पहिल्या कार रो-रो सेवेला फार कमी प्रतिसाद मिळाला आहे. कोकण रेल्वेने जरी ही कार रो-रो सेवा सुरू केली असली तरीही मुंबईकर कोकणात जाणाऱ्यांना ही कार रो-रो सेवा सुरू होईल की नाही. अशी शंका वाटत होती. पंरतु कोकण रेल्वेने गणेशभक्तांना कोकणात जाण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात जर या रेल्वे कार रो-रो सेवेने जायचा निर्णय मुंबईकर कोकणवासीयांनी घेतला, तर निश्चितच मुंबई ते कोकण ही कार रो-रो सेवा उपयुक्त ठरेल. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील त्रासही वाचू शकतो. नजिकच्या काळात प्रतिसाद कसा मिळतोय ते समजून येईल. - संतोष वायंगणकर