Sunday, August 24, 2025

सीझर पुरता गाळात...

सीझर पुरता गाळात...
इंग्रजीत एक म्हण प्रसिद्ध आहे ती म्हणजे सीझरची पत्नी संशयाच्या पलीकडे असली पाहिजे. आपल्याकडे हे वचन वारंवार वापरण्यात येते. सीझर पुरता गाळात अडकला आहे याची आठवण अनिल अंबानी प्रकरणावरून येते. कारण अनिल अंबानी जे की जगप्रसिद्ध अंबानी घराण्याचे वंशज आहेत आणि मुकेश अंबानी या जगातील अतिश्रीमंत व्यक्तीचे धाकटे भाऊ आहेत त्यांची अवस्था सध्या केविलवाणी झाली आहे. अनिल अंबानी हे सध्या १७ हजार कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अडचणीत सापडले आहेत आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आहेत. आता ते या प्रकरणातून सुटतील की नाही हे सर्वस्वी कायदेशीर प्रक्रियेवर आणि तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांवर आधारित आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी अंबानी आणि त्यांच्या आर कॉम विरोधात तक्रार नोंदवली आणि त्यासंबंधात अंबानी यांना आता धावपळ करावी लागत आहे. यापूर्वी सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी केली होती. अर्थात या प्रकरणी पुढे काय होऊ शकते हे सर्वस्वी काय पुरावे मिळतात यावर अवलंबून आहे. जर पुरावे भरभक्कम असतील, तर अनिल अंबानी यांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागू शकते. अंबानी यांच्या कंपन्यांनी कर्ज कशाप्रकारे वळवले आणि कुठून घेतले याचा तपास केला जाईल. अनिल अंबानी हे देशातील नामांकित उद्योगपती आहेत आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे भाऊ आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई ही अंबानी घराण्याला मोठा धक्का आहे असे मानले जात आहे, केवळ इतकेच नव्हे तर उद्योग जगताला घक्का आहे. अर्थात अंबानी यांच्यावर कारवाई केली जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी म्हणजे २०२३ सालीही सक्तवसुली संचालनालयाने अनिल अंबानी यांच्यावर कारवाई केली होती आणि त्या तपासात ईडीला अनेक अनियमितता आढळून आल्या होत्या. कोणतीही शहानिशा न करता कंपन्याना कर्ज देणे आणि आवश्यक कागदपत्रे नसणे आणि शेल कंपन्यांच्या नावावर कर्ज मंजूर करणे अशा त्या अनियमितता होत्या, पण सध्याचे प्रकरण हे एसबीआयशी संबंधित आहे आणि म्हणून ते जास्त अंबानींचा पाय खोलात जाणारे ठरले आहे. मुंबईतील कफ परेड येथील निवासस्थानी अंबानी यांच्यावर छापेमारी करण्यात आली. त्यामुळे सर्व देशात खळबळ उडाली. अंबानी यांच्यावर आणि त्यांच्या आर कॉमवर गुन्हेगारी कट रचणे, बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि या घोटाळ्यामुळे बँकेला २९२९.०५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. अर्थात अनिल अंबानी यांनी आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. सीबीआयच्या कारवाईनंतर आपल्याला एकट्यालाच बाहेर काढण्यात आले आणि त्यांना त्यांचे म्हणणे ऐकूनही घेतले नाही. शिवाय अंबानी यांचे म्हणणे असे आहे, की जेव्हा हा घोटाळा झाला तेव्हा आपण आपल्या व्यवस्थापनाच्या निर्णयांमध्ये कसलाही सहभाग नव्हता. पण खरा गंभीर आरोप हा आहे, की अंबानी यांच्या कंपनीविरुद्ध जानेवारी २०२१ मध्ये तक्रार केली होती आणि त्यात म्हटले होती, की अंबानी यांचे खाते फसवणूक म्हणून वर्गीकृत केले गेले होते. याला अंबानी काय उत्तर देणार याची सर्वांानाच उत्सुकता आहे. अनिल अंबानी यांचे म्हणणे असे आहे की आपल्याला सुनावणीची संधी दिली नाही, तर सीबीआयने म्हटले आहे, की अंबानी आणि त्यांच्या आर कॉमने अनेक घोटाळे केले आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे, की अनिल अंबानी हे काही कंपनीचे बोर्ड मेंबर नव्हते आणि त्यामुळे ईडीच्या कृतीचा काहीही परिणाम होणार नाही. पण यामुळे रिलायन्स उद्योगसमूहाची अप्रतिष्ठा झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ईडीच्या कारवाईच्या प्रशासनावर अथवा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही असे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे म्हणणे असले तरीही रिलायन्सचे नाव बदनाम झाले आहे. या सर्व प्रकरणात अति गंभीर बाब म्हणजे एसबीआयनंतर बँक ऑफ इंडियाने फसवे म्हणून घोषित केले आहे. एका नोटिसीत अनिल अंबानी आणि मंजरी आशिक काकर यांच्या कर्ज खात्यांना फसवणूक म्हणून टॅग करण्यात आले. अंबानी उद्योगसमूह, बिर्ला आणि टाटा यांच्यासारखे काही उद्योग सोडले, तर भारतातील उद्योग फारसे नावारूपाला आलेच नाही. जे आले त्यांनाही भाऊ बंदकीने ग्रासले आहे. त्यामुळे अंबानी हा एकमेव उद्योग असा होता की ज्याची तोफ बुलंद होती आणि मुकेश अंबानी हे तर आज सर्वात धनाढ्य व्यक्ती आहेत भारतात नव्हे तर जगात. त्यामुळे उद्योग जगताची नामुष्की झाली आहे. यातही अनिल अंबानी यांचे पतन तर फारच क्लेशदायक आहे. कारण एकेकाळी ट्रिलियन रुपयांच्या मालकीचा उद्योगसमूहाचा मालक असलेले अनिल अंबानी आज आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनिल अंबानी यांच्या कारकीर्दीला हा मोठा धक्का असून रिलायन्सची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ५० कंपन्या आणि कित्येक लोकांवर धाडी टाकण्यात आल्या आणि तेथेच अनिल अंबानी यांचे ग्रह फिरले. ईडीच्या धाडीनंतर रिलायन्स पॉवरचे शेअर्सचे भाव पाच टक्क्यांनी कोसळले आणि जरी अंबानी यांनी आर कॉम किंवा आरएचएलएफशी कोणतेही आर्थिक संबंध असल्याचे नाकारले आहे, तरीही यात कुठेतरी पाणी मुरते आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. रिलायन्स इन्फ्रा बोर्डवर अनिल अंबानी नाहीत आणि बोर्ड सदस्यही नाही असे रिलायन्सने अधोरेखित केले असले तरीही सत्य त्यामुळे लपून राहत नाही. आता अनिल अंबानी यांना सत्य काय त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत अनिल अंबानी यांना कायदेशीर लढाईची तयारी करावी लागेल.
Comments
Add Comment