
मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या घराचे बांधकाम आता पूर्ण झाले असून, लवकरच ते गृहप्रवेश करणार आहेत. मुंबईतील पाली हिल परिसरात बांधलेल्या या सहा मजली आलिशान बंगल्याची किंमत सुमारे २५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे हे घर बॉलिवूडमधील सर्वात महागड्या घरांपैकी एक बनले आहे.
हे घर रणबीर कपूरच्या कुटुंबासाठी खूप खास आहे. या जागेवर रणबीरचे आजोबा, प्रसिद्ध अभिनेते राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्णा राज कपूर यांचे घर होते. आता रणबीरने त्याच ठिकाणी एक आधुनिक आणि भव्य बंगला उभारला आहे. या बंगल्याला त्याने आपल्या आजीच्या नावावरून 'कृष्णा राज' असे नाव दिले आहे. रणबीर-आलिया त्यांची मुलगी राहा कपूरसोबत या नवीन घरात लवकरच शिफ्ट होणार आहेत.
सोशल मीडियावर या बंगल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात घराची भव्यता स्पष्टपणे दिसते. बंगल्याचे बाह्य डिझाइन आधुनिक असून, त्यात पांढऱ्या आणि ग्रे रंगाचा वापर केला आहे. प्रत्येक मजल्यावर मोठ्या बाल्कनी असून, त्यात हिरवीगार झाडे लावण्यात आली आहेत. घरात मोठे झुंबर, आलिशान सोफे आणि सुंदर इंटिरियर आहे.
या बंगल्याची किंमत शाहरुख खानच्या 'मन्नत' आणि अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यापेक्षाही जास्त असल्याचा दावा केला जात आहे, ज्यामुळे याची चर्चा अधिकच वाढली आहे. रणबीर आणि आलियाने या घराच्या बांधकामावर जातीने लक्ष ठेवले होते. ते अनेकदा त्यांची आई नीतू कपूर आणि मुलगी राहासोबत बांधकाम पाहण्यासाठी आले होते. आता हे कपल आपल्या नव्या घरात मुलीसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास उत्सुक आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ते गृहप्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.