Monday, August 25, 2025

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून संपूर्ण मुंबईत मिळून २७५ हून अधिक कृत्रिम तलाव उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आहे. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्ती कृपया आपल्या जवळच्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित कराव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी आता मुंबईकरांनीही जास्तीत जास्त पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती खरेदी करून तिची प्रतिष्ठापना करावी आणि उत्सवानंतर कृत्रिम तलावातच मूर्तींचे विसर्जन करावे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने यावर्षी २७५ हून अधिक कृत्रिम तलाव उभारले आहेत. भाविकांनी घरगुती निसर्गस्नेही गणेशमूर्ती घरी बादली तथा पिंप यामध्ये विसर्जित करावी. अथवा सोसायटीतील नागरिकांनी एकत्रितपणे व्यवस्था करुन मूर्ती विसर्जन करावे. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्ती कृपया आपल्या जवळच्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित कराव्यात,असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईतील ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांसह मागील वर्षी २०४ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आली होती. तर त्या आधीच्या वर्षी कृत्रिम तलावांची संख्या १९१ एवढी होती, ती संख्या वाढवून २०४ एवढी करण्यात आली होती. त्यामुळे ही संख्या २२० ते २३० पर्यंत जाईल असे बोलले जात होते, परंतु न्यायालयाने सहा फुटापर्यंतच्या गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याचे निर्देश दिल्याने यंदा २७५ पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

निसर्गस्नेही असो किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मध्ये घडवलेल्या मूर्ती, अशा सर्व मूर्ती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण मुंबईत कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. या तलावांमध्ये भाविकांनी मूर्ती विसर्जित करावी. तलावांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच यादी पाहण्यासाठीचे क्यूआर कोड विविध माध्यमातून प्रकाशित करण्यात येत आहेत. त्यानुसार आपल्या घरानजीकचा तलाव शोधून तेथे मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानगी एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाइन पद्धतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेडून देण्यात येत आहे. सोमवार, दिनांक २१ जुलै २०२५ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत ११५० हून अधिक सार्वजनिक मंडळांना मंडप उभारणी परवानगी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment