‘तुमको ना भूल पाएंगे.’

  18

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे


सुमारे ९९ वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्मलेल्या श्रीष्टीनाथ कपूर नावाच्या माणसाने तब्बल ५ तास लांबीचा १० गाणी असलेला सुंदर हिंदी सिनेमा काढला होता. त्याने बरीच संपत्ती गहाण टाकून हा सिनेमा काढला मात्र बॉक्स ऑफिसवर तो साफ कोसळला.
बरोबर ! त्या अभिनेता-दिग्दर्शकांचे नाव होते राज कपूर. सिनेमा होता ‘मेरा नाम जोकर’. राजकपूरचे जवळचे मित्र ख्वाजा अहमद अब्बास यांनी त्याच्या जीवनातील काही सत्य गोष्टी गुंफून कथानक तयार केले होते. गीतकार होते हसरत जयपुरी, शैलेन्द्र, प्रेम धवन
आणि नीरज.
सेनिया रॅबीनकिना ही ५५ वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या त्या सिनेमाची एक नायिका आणि काही कलाकार रशियन होते. त्याशिवाय सिनेमात पद्मिनी, सिमी गरेवाल, मनोजकुमार, राजेंद्रकुमार, धर्मेंद्र, दारासिंग, ओमप्रकाश, राजेंद्रनाथ, अचला सचदेव असे नामांकित कलाकार होते. सेनिया पुन्हा बॉलीवूडमध्ये दिसली ती थेट २००९ मध्ये ‘चिंटूजी’ या ऋषी कपूरच्या चित्रपटात!
तत्कालीन ‘सोव्हियत यूनियन’मध्ये जोकर बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आज त्याची नोंद राजकपूरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात केली जाते. सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले- त्यात सर्वश्रेष्ठ बाल कलाकार म्हणून ऋषीकपूरला (पदार्पण), सर्वश्रेष्ठ गायक म्हणून मन्ना डे यांना (‘ए भाई जरा देखके चलो’साठी), सर्वश्रेष्ठ छायांकनासाठी राधू कर्माकर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर १९ व्या फिल्मफेयर महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राज कपूरला, सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून शंकर-जयकिशन यांना, सर्वोत्कृष्ट गायक म्हणून मन्ना डे साहेबांना आणि सर्वोत्कृष्ट छायांकनाचा पुरस्कार राधू कर्माकर यांना आणि सर्वश्रेष्ठ ध्वनी डिजाइन-अलाउद्दीन खान कुरैशी यांना देण्यात आला.
सिनेमाची सगळीच गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. त्यात कवी नीरज यांचे मुकेशने गायलेले ‘ए भाय जरा देखके चलो’ हसरत जयपुरी यांची मुकेशने आशाताईंबरोबर गायलेली कव्वाली ‘कंही दाग ना लग जाये’ नीरज यांचेच ‘कहता हैं जोकर सारा जमाना, आधी हकीकत आधा फसाना’ शैलेंद्रचे ‘जीना यहां मरना यहां, इसके सिवा जाना कहां’ खूप गाजले.
सिनेमाची सुरुवात नाट्यमय होती. तीन महिलांना सर्कसच्या एका शोचे निमंत्रण येते. निमंत्रणाबरोबर विदूषकाची एक बाहुली भेट म्हणून पाठवलेली असते. त्या सर्कसमधील विदूषकाचा तो शेवटचा प्रयोग असतो. शो सुरू होतो आणि मग ‘फ्लॅश बॅक’ पद्धतीने जोकरचे आयुष्य आणि वेगवेगळ्या वेळी त्याच्या आयुष्यात येऊन गेलेल्या त्याच्या त्या ३ प्रेमिकांची भूमिका उलगडत जाते अशी
कथा होती.
सर्व बारकावे अगदी काटेकोरपणे पाहणाऱ्या राजकपूरने सिनेमा पूर्ण करायला तब्बल ६ वर्षे लावली. सिनेमाचा दर्जा सर्वोत्कृष्ट होताच. पण शेवटी एकेका कलाकृतीचेही नशीब असते, हेच खरे! गुरुदत्तचा ‘प्यासा’, जो नंतर सिनेमाच्या अभ्यासक्रमाचा भाग झाला, तो आधी कसा कोसळला होता हे सर्वांना
माहीत आहे.
राजकपूरच्या तोंडी असलेले एक गाणे त्याच्या जीवनाशी जितके निगडित होते तितकीच ती त्याकाळची एक सार्वत्रिक भावना होती. सार्वत्रिक शोकांतिका होती. जुना ‘आपला’ म्हणता येईल असा काळ निघून गेलेला, उत्कट प्रेमाची वर्षे हरवून गेलेली, प्रिय व्यक्तीची कायमची ताटातूट झालेली. तरीही हृदयातला एक कोपरा त्याच आठवणींनी दाटला आहे ही भावना किती वेदनादायी असते! प्रेमाच्या पूर्ततेपेक्षा कायमची ताटातूट हेच त्याकाळी बहुतेक प्रेमकथांचे अटळ भविष्य असायचे!
शंकर-जयकिशन यांनी अजरामर केलेले हसरत जयपुरी यांचे मुकेशच्या नितळ, सात्विक आवाजातले त्या गाण्याचे नितांत हळवे शब्द होते-
‘जाने कहा गये वो दिन,
कहते थे तेरी राहमे,
नज़रोंको हम बिछाएंगे.
चाहें कही भी तुम रहो,
चाहेंगे तुमको उम्रभर,
तुमको ना भूल पायेंगे...’
किती अगतिक, हरलेपणाची भावना. तरीही केवढी उत्कट आणि शाश्वत! सगळे हरवल्यावरही दुसऱ्याला आश्वस्त करणारे किती विशाल हृदय! पहिल्या कडव्यातच कवीच्या तरल लेखणीची कल्पना येते.
प्रिया येणार असेल तेव्हा तिच्या वाटेवर पायघडी म्हणून आपली नजरच अंथरायची त्याची इच्छा असायची. पण सगळे विपरीत घडले आणि कथा मध्येच संपली. ती कुठे आहे तेही त्याला माहीत नाही. तरीही तो म्हणतो ‘तू कुठेही असलीस तरी मी तुझी आठवण कधीही विसरणार नाही.’ ‘आठव ना, एके काळी मी जिथे जिथे गेलो तिथे उमटलेल्या माझ्या पावलांवर उभे राहून तू प्रार्थना केली होतीस आपल्या प्रेमाच्या पूर्ततेसाठी! पण जशी तू गेलीस तसा जीवनातला वसंत कायमचा निघूनच गेला! माझे अश्रू नंतर कधीच थांबले नाहीत.
‘मेरे कदम जहां पड़े,
सजदे किए थे यारने,
मुझको रुला रुला दिया,
जाती हुई बहारने.
जाने कहा गये वो दिन..’
तू गेल्यापासून जीवनात केवळ अंधारच अंधार आहे. मी आता इतका एकाकी आहे की फक्त माझी सावलीच माझ्याबरोबर असते. कुठे गेले ते आपले दिवस?
‘अपनी नज़रमे आजकल,
दिन भी अंधेरी रात हैं.
सायाही अपने साथ था,
सायाही अपने साथ हैं.’
शेवटी प्रेमाची बाजी हरलेला प्रियकर म्हणतो, ‘आता तर काय शेवटच जवळ आलाय. उद्या मी या जगात असेन किंवा नसेनही. पण जगरहाटी थोडीच थांबणार आहे? अविरत फिरणारे ग्रहतारे तर त्यांची आवर्तने पूर्ण करतच राहणार ना? मग माझी आठवण तुझ्याही मनातून पुसली जाईल. इतर अनेकांच्या मनातूनही पुसली जाईल. पण मी मात्र तुझाच राहीन. माझ्या अस्तित्वाच्या खुणा इथेच राहून जातील. आपल्या प्रेमाच्या आठवणी जिथे आहेत ते ठिकाण सोडून मी जाणार तरी कुठे? जेव्हा कधी तुला वाटेल, तेव्हा मला फक्त एक हाक मार, मी इथेच आहे, तुझी वाट पाहात
इथेच असेन.’
‘कल खेलमे हम हो न हो,
गर्दिशमे तारे रहेंगे सदा.
भूलोगे तुम, भूलेंगे वो.
पर हम तुम्हारे रहेंगे सदा.
रहेंगे यही अपने निशा,
इसके सिवा जाना कहां.
जी चाहे जब हमको आवाज दो,
हम हैं वोही हम थे जहां.’
काही भावना अत्यंत व्यक्तिगत असल्या तरी त्या गुप्तपणे अतिशय सार्वत्रिक असतात. मानवी जीवनाच्या नाट्यात अनेकांना त्या मन:स्थितीतून जावे लागते. जखमांचे व्रण सर्वांचे सारखेच असतात. ते खूप खोलातले असल्याने एकमेकांना दाखवता येत नाहीत. पण हसरत जयपुरीसारखे कवी त्याही भावना किती हळूवारपणे कागदावर उतरवतात हे पाहिले की हळवे व्हायला होतेच.

Comments
Add Comment

गणपतीची अनेकविध रूपं

डॉ. अंबरीष खरे : ज्येष्ठ अभ्यासक सध्या अवघे समाजमन गणेशोत्सवाच्या तयारीत गर्क आहेत. लवकरच नेहमीच्या उत्साहात

असा झाला गणेशाचा जन्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे हिंदू संस्कृतीत गणपती या देवतेला सर्वोच्च मान असून गणपती हा विघ्नहर्ता

सर्वेपि सुखिनः सन्तु।

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, देश स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य

मुलांना चांगल्या सवयी कशा लावाल?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू लहानपणापासून मुलांना चांगल्या गोष्टी किंवा संस्कार दिल्यास भविष्यात हीच मुलं

प्रथम तुला वंदितो...

मनस्वीनी : पूर्णिमा शिंदे कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने होते. असा हा पवित्र, मंगलमय,

दातृत्व

दामले बाईंचा आज शाळेतील सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस होता. जवळजवळ ३६ वर्षे त्यांची सेवा झाली होती. शिक्षक