
महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
हिंदू संस्कृतीत गणपती या देवतेला सर्वोच्च मान असून गणपती हा विघ्नहर्ता असल्याचे मानले जाते. गणपती हा शिवपार्वतीचा पुत्र असल्याचा पुराणात उल्लेख आहे. गणपतीला गजानन, वक्रतुंड, एकदंत, कृष्ण पिंगाक्ष, गजवक्र लंबोदर, विकटमेव, विघ्नराजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक आदी अनेक नावे आहेत.
पुराणात गणपतीच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी पुढील वर्षी आख्यायिका सर्वमान्य आहे. पार्वतीने तिला तिच्या दोन दासींनी अंघोळीपूर्वी लावलेल्या उटण्याच्या मळापासून तयार केलेल्या एका मूर्तीला सजीव करून आपल्या स्नानगृहाच्या दारावर उभे केले. त्याचवेळी महादेव आले असताना त्या बालकाने माता पार्वती स्नान करीत असल्याचे सांगून त्यांना अडविले. त्यावेळेला या दोघांचे युद्ध होऊन शंकराने बालकाचे शीर उडविले. हे पाहून पार्वतीला अत्यंत दुःख झाले व आपल्या बालकाला जिवंत करण्याचा आग्रह तिने शंकर देवांकडे केला. तेव्हा शंकरांनी आपल्या गणांना उत्तर दिशेला जाऊन प्रथम दिसेल त्या प्राण्याचे शीर आणण्याची आज्ञा दिली व अशाप्रकारे प्रथम भेटलेल्या हत्तीचे शिर आणून या बालकाला सजीव करण्यात आले. अशा प्रकारे हत्तीचे शिर असल्याने ते बालक गजानन म्हणून प्रसिद्ध झाले.
श्रीगणेश पुराणातही गणपतीच्या जन्मासंदर्भात उल्लेख आहे. त्यानुसार शिवपार्वतीचा विवाह होऊन बराच कालावधी झाला. तेव्हा पार्वतीला पुत्रप्राप्तीची इच्छा झाली. आपल्याला एक अत्यंत श्रेष्ठ पुत्र व्हावा अशी इच्छा तिने भगवान शंकरांजवळ व्यक्त केली. महादेवांनी तिला पुण्यक व्रत करण्यास सांगितले. सर्व नियम पाळून एक वर्ष हे व्रत केल्यास मनोवांच्छित सर्व इच्छा पूर्ण होतात असे सांगितले.
पार्वतीने हे व्रत करण्याचे ठरविले. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र व वेदशास्त्र संपन्न, हरिभक्त, परमज्ञानी सनत्कुमाराच्या पौरोहित्याखाली हे व्रत केले. एका वर्षाने व्रताची सांगता पूर्ण होताच अशा प्रकारचे व्रताची सांगता होताच एक अत्यंत गरीब ब्राह्मण तेथे येऊन आपण अत्यंत भुकेले आहोत असे म्हणून भिक्षा मागू लागला. शिवपार्वतीने त्याचा यथोचित सत्कार करून त्याला भोजन व अलंकार वस्त्र देऊन नमस्कार केला. तो ब्राह्मण अंतर्धन पावला. तेवढ्यात आकाशवाणी होऊन तो ब्राह्मण म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून जगत्पालक जनार्दनच होते व बालकरूपाने ते तुमच्या घरी प्रगट झाले आहे असे शिव पार्वतीला सांगितले. अंत:पुरात जाऊन शिव-पार्वतीने त्या बालकाला आनंदाने उचलून घेतले. अशाप्रकारे परब्रह्म परमात्म्याने शंकरांच्या घरी जन्म घेतल्याचा आनंदोत्सव सर्व देवतांनी साजरा करून बालकावर शुभाशीर्वादाचा वर्षाव केला.
अशाप्रकारे आनंद उत्सव सुरू असतानाच गणेशाच्या भेटीसाठी शनिदेवांनी महादेवांना विनंती केली. महादेवांनी शनिदेवांना पार्वतीमातेकडे पाठवले. शनिदेव गणेशाच्या भेटीची परवानगी मागू लागले; परंतु ती मागत असतानाच त्यांनी आपल्याला पत्नीच्या शापामुळे आपण ज्याच्याकडे पाहू त्याचा विनाश होईल असा शाप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या या कथनावर खळखळून हसून पार्वतीने शनिदेवांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले व गणेशाचे मुखावलोकन करण्याची शनीदेवांना परवानगी दिली. आतापर्यंत जमिनीकडे नजर करून उभ्या असलेल्या शनीदेवांनी आपल्या डोळ्यांच्या केवळ कोपऱ्यातूनच त्या गणपतीच्या मुखाकडे पाहिले मात्र तक्षणीच त्याचे शीर धडापासून अलग होऊन गोलोकात परमात्म्याला समर्पित झाले. हे दृश्य पाहून पार्वती विलाप करू लागली. पार्वतीमातेचा विलाप पाहून विष्णू गरुडावर बसून तिथे आले व तक्षणीच उत्तरेकडे जाऊन प्रथमतः दिसलेल्या प्राण्याचे म्हणजे हत्तीचे शीर घेऊन येताना हत्तिणीने त्यांना अडवून आपल्या पतीला परत मस्तक लावून जिवंत करण्याची विनंती केली, अन्यथा शाप दिला जाईल असे सांगितले, तसेच हे शीर दुसऱ्या कोणाला लावण्यासाठी आपण नेत असाल अशी शंका उपस्थित करून जर तुम्ही माझ्या हत्तीला जिवंत करू शकत नसाल, तर त्याला मारण्याचाही तुम्हाला अधिकार नाही असे बजावले आणि तुम्ही माझ्याच हत्तीचे शिर का कापले असे म्हणून त्याला जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा भगवान विष्णूने उत्तरेकडे भेटलेल्या पहिल्याच प्राण्यांच्या शीरामुळेच गणेश पुन्हा जिवंत होणार आहे असे सांगून तुझ्याही हत्तीला मी जिवंत करतो असे म्हणून त्यांनी दुसऱ्या एका हत्तीचे मस्तक आणून त्याला लावून त्या गजराजाला जिवंत केले व त्याला आशीर्वादही दिले.
अशाप्रकारे आणलेले हत्तीचे मस्तक गणेशाला लावून त्यांनी पुन्हा सजीव केले. ब्रह्मदेवांनी गणेशाला आपला मुकूट दिला, तर श्री विष्णूंनी त्यांना आपला कौस्तुभमणी दिला. धर्माने त्यांना रत्नांची आभूषणे दिली, तर अन्य देवदेवतांनीही अनेक अलंकार अर्पण केले. महादेवांनी प्रसन्न होऊन गणेशाला सदैव विजयी होण्याचा आशीर्वाद दिला. आपल्या गणेशाला हत्तीचे मूख पाहून पार्वतीला थोडे दुःख झाले. पार्वतीमातेने माझ्या मुलाचे असे का केले असे भगवंताला विचारले असता महादेव म्हणाले की, तुझा हा मुलगा अतिशय बुद्धिमान, पराक्रमी त्रिलोका मान्य होऊन देवतांच्या पूजेमध्ये त्याला अग्रपूजेचा मान मिळेल असे सांगितले. तसेच गणेश हा बुद्धी प्रदान करणारा असेल असे सांगून पार्वती मातेचे समाधान केले.
आपल्या पुत्राचे शीर वेगळे करणाऱ्या शनी देवांचा पार्वतीला अतिशय राग आला. पार्वतीमातेने शनीदेवांना अंगभंग होण्याचा शाप दिला. तेव्हा सूर्य, इंद्र, विष्णू आदीं अनेक देवतांनी पार्वतीची मनधरणी करून तिला विनविले. तेव्हा पार्वतीमातेने शाप परत घेणे, तर शक्य नाही; परंतु अंगभंगाची ही शापवाणी पायापुरतीच मर्यादित असेल असे सांगितले. त्यामुळे शनिदेव पायाने लंगडे झाले असा उल्लेख श्रीगणेश पुराणात आहे.