Sunday, September 14, 2025

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९ महिन्यांत चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या ४ दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाचा उदय झाला असून, नव्या खेळाडूंसाठी संधींचे दरवाजे उघडले आहेत.

चेतेश्वर पुजाराने जाहीर केली निवृत्ती

भारताचा दिग्गज कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने रविवारी (२४ ऑगस्ट २०२५) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. गेल्या काही वर्षांपासून त्याला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते, त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. पुजाराने आपल्या कारकिर्दीत १०३ कसोटी सामने खेळले असून, ४३.६० च्या सरासरीने ७,१९५ धावा केल्या आहेत. यात १९ शतकांचा समावेश आहे. आपल्या निवृत्तीच्या घोषणेवेळी तो भावूक झाला होता. "भारतीय जर्सी परिधान करणे, राष्ट्रगीत गाणे आणि मैदानावर प्रत्येक वेळी आपला सर्वोत्तम खेळ दाखवणे हा अनुभव शब्दांत व्यक्त करणं शक्य नाही," असे त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

या आधीही दिग्गजांनी दिला क्रिकेटला रामराम

पुजाराच्या निवृत्तीपूर्वीच भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठ्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

रविचंद्रन अश्विन: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो भारताकडून कसोटीत दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा: या वर्षी मे महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची निवड होण्यापूर्वीच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. या दोघांनीही गेल्या दशकात भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व केले आहे.

या चार खेळाडूंच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये एका युगाचा अंत झाला आहे आणि आता नव्या दमाच्या खेळाडूंकडे संघाची धुरा आली आहे.

Comments
Add Comment