Sunday, August 24, 2025

झोप

झोप

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

शरीर तसेच मनाच्या विश्रांतीची ‘झोप’ ही नैसर्गिक अवस्था असते. झोप आपल्या शरीराला दुरुस्त करण्यासाठी आणि पुनर्जीवित करण्यासाठी आवश्यक आहे. पुरेशी आणि चांगली झोप न मिळाल्यास हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. झोप आपल्या मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाची आहे. चांगली झोप न मिळाल्यास नैराश्य, चिडचिडेपणा आणि एकाग्रता कमी होणे इ. समस्या उद्भवू शकतात. या शारीरिक आणि मानसिक समस्या आपल्याला माहीत असल्या तरी आपण झोपेसाठी स्वतःहून काहीच करू शकत नाही.

एकदा झोपेने ठरवले माणसाकडे फिरकायचे नाही, तर ती रात्रभर फिरकतच नाही! माणसाने ठरवले झोपायचे तर झोपेच्या मनाविरुद्ध ते शक्यच होत नाही! या काही कवितेच्या ओळी नाहीत किंवा कोणत्या कथेतली चमकदार वाक्ये नाहीत. रोजच्या जीवनातील साधे तत्त्वज्ञान आहे.

रस्त्यावरच्या कचराकुंडीच्या बाजूला आपण दोन मिनिटे उभे राहू शकत नाही, पण तिथेच बाजूला गाढ झोपलेल्या कामगाराला पाहिले की पाच ते आठ इंची गुबगुबीत गादीवर झोप न येणाऱ्या आपल्याला साहजिकच असूया निर्माण होते. कारण कोणतीही गोष्ट विकत घेता येते, झोप विकत घेता येत नाही. सर्वात वाईट म्हणजे आपल्यासोबत झोपणारा जर घोरणारा असेल तर झोपेची पुरती वाट लागून जाते. प्रवासात डुलक्या खाणारी माणसे आपल्याला दिसतात. कधी कधी चुकून झोप लागल्यामुळे काही स्टेशन पुढेही ती निघून जातात. म्हणजे हवी तेव्हा झोप येत नाही आणि नको तेव्हा ती येते.

इथे एका बाईचे उदाहरण घेऊया. अनेक डगरीवर पाय देत दिवसभर प्रचंड कष्ट करणारी बाई कधीतरी झोपू इच्छिते लवकर, पण तिला ते शक्य होत नाही. जेवण झाल्यावर नवरा, सासू-सासरे, मुले मस्त आडवी-तिडवी होतात, लोळतात, झोपतात. पण जेवल्यानंतर ती झोपण्यासाठी जाऊ शकत नाही. स्वयंपाकघर आवरण्यातच तिचा कितीतरी वेळ जातो आणि मग त्यानंतर दही लावणे असो, दुसऱ्या दिवशीसाठी कडधान्य भिजवायचे असो, इडलीडोस्याचे पीठ वाटायचे असो वा आणखी कितीतरी कामे म्हणजे भांडी घासायची असो नाही तर भांडी विसळून नीट ठेवायची असोत, तिला त्यासाठी वेळ द्यावा लागतोच! गॅस स्वच्छ करणे, ओटा पुसणे, दुसऱ्या दिवशी शाळा-कॉलेज - ऑफिसमध्ये जाणाऱ्या घरातील सगळ्यांचे डबे काढून समोर ठेवणे... लांबलचक मोठी यादी आहे. शेवटी काय तर स्वयंपाकघरातून निघायला तिला कितीतरी वेळ लागतो. स्वयंपाकघरातून निघाल्यावर तिचे काम संपते का? निश्चितच नाही. दुसऱ्या दिवशी धुवायचे कपडे एकत्र करून बाथरूममध्ये नेऊन ठेवणे, इस्त्रीवाल्याचे कपडे बांधून ठेवणे, दुधवाल्यासाठी दाराबाहेर पिशवी लटकवणे अशी कितीतरी त्यानंतरची कामे तिला करावीच लागतात. ती झोपायला जाते तेव्हा अर्धमेली झालेली असते. कधी अंग टाकते असे तिला होते मात्र तिची झोप तोपर्यंत उडून गेलेली असते. ‘झोप’ ही गोष्ट मूडी आहे. ती कधी बिलगेल आणि कधी आपल्याजवळ फिरकणारच नाही. रात्रभर तळमळण्यापलीकडे कोणीही काहीच करू शकत नाही. जर एक रात्र वाईट गेली तर दुसरा पूर्ण दिवस वाईट जातो. अगदी आजारी असल्यासारखे वाटत राहते.

बरे, एखाद्या रात्री तिला झोप येतेही. नेमके त्या दिवशी नवऱ्याला, मुलाला किंवा सासू-सासऱ्यांना जर झोप नाही आली तरी तिला झोपमोड करत त्यांना काय होतेय ते पाहावे लागते. म्हणजे सासू खोकत असेल तर त्यांना तिला गरम पाणी करून नेऊन द्यावे लागते. मुलाला ताप असेल तर रात्रभर त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या लागतात. मुलीचे पोट दुखत असेल तर तिला तव्यावर ओवा भाजून गरम पाण्यासोबत प्यायला देणे. नवऱ्याला झोप नाही आली तर तो रात्रभर कुशी बदलत राहतो आणि मग तिच्याही झोपेचे खोबरे होते. हे एक प्रतिनिधिक उदाहरण. जसे कुटुंब आणि माणसे बदलतील तशी ही उदाहरणे बदलतील!

अलीकडे झोप यावी यासाठी अनेक उपाययोजनांची यादी दिलेली दिसते. या यादीत रात्री झोपताना अांघोळ करावी असे म्हटले आहे, पण कामे उरकता उरकताच रात्रीचे १२ वाजतात त्यानंतर कधी अांघोळ करणार? झोपण्याआधी कोणता तरी काढा बनवून प्यायला सांगतात. ते बनवायचे त्राण घरातल्या कोणाकडे असते? थोडा वेळ मेडिटेशन करून मग झोपायला सांगतात. कधी गादीला पाठ टेकते असे होऊन जाते. मेडिटेशन करण्यासाठी कोण वेगळा वेळ काढणार? काही मुद्रा सांगितलेल्या आहेत पण त्या ज्या दिवशी झोप येत नाही त्या दिवशी आठवतातच, असे नाही. असो. शरीर तसेच मनाच्या विश्रांतीची ‘झोप’ ही नैसर्गिक अवस्था असते. झोप आपल्या शरीराला दुरुस्त करण्यासाठी आणि पुनर्जीवित करण्यासाठी आवश्यक आहे. पुरेशी आणि चांगली झोप न मिळाल्यास हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. झोप आपल्या मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाची आहे. चांगली झोप न मिळाल्यास नैराश्य, चिडचिडेपणा आणि एकाग्रता कमी होणे इ. समस्या उद्भवू शकतात. या शारीरिक आणि मानसिक समस्या आपल्याला माहीत असल्या तरी आपण झोपेसाठी स्वतःहून काहीच करू शकत नाही. झोपेला जर आपल्याकडे फिरकायचे असेल तर ती फिरकते नाहीतर आपल्यावर रुसून बसते. काय करणार?

आपल्याला जर ड्रायव्हरबरोबर प्रवास करायचा असेल तर आपल्या झोपेपेक्षा ड्रायव्हरच्या पूर्ण झोपेची आणि विश्रांतीची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. कारण नजर हठी, दुर्घटना घटी! शेवटी काय तर आपल्या आयुष्यात अशी अनेक माणसं येतात. आपल्याला ती झोपेत आहेत असे वाटते. झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवता येत नाही! हे कायम लक्षात ठेवा. सावध व्हा. स्वतः झोपा आणि आपल्या इतकीच दुसऱ्यांच्याही झोपेची काळजी घ्या!

Comments
Add Comment