Sunday, August 24, 2025

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि. सिंधुदुर्ग) स्थानकात पोहोचली. गाडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गाडीतून चार वाहने नांदगाव स्थानकात उतरली.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने कार ऑन रोल सुविधा सुरू केली असून या सेवेचा प्रारंभ झाला. या सेवेला कोकणवासीयांकडून अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. केवळ पाच वाहने घेऊन कोकण रेल्वेची पहिली गाडी काल सुटली. कोकण रेल्वे मार्गावर ट्रक ऑन रेल म्हणजे रोरो सुविधा आजवर उपलब्ध होती. यंदा पहिल्यांदाच कार ऑन रेल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शनिवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास कोलाड स्‍थानकात या पहिल्या रो रो गाडीला हिरवा झेंडा दाखवण्‍यात आला. तत्‍पूर्वी या सेवेच्‍या पहिल्‍या प्रवाशांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्‍वेचे वरिष्‍ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी रस्‍त्‍यावर खडडे पडले आहेत. रस्‍त्‍याच्‍या दुरवस्‍थेमुळे गणेशोत्‍सवासाठी कोकणात येणाऱ्या कोकणवासीयांचे हाल होतात शिवाय वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. यातून सुटका व्‍हावी यासाठी कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडल्‍या आहेत. याशिवाय कार ऑन रोल सेवा सुरू केली आहे. रायगडमधील कोलाड रेल्‍वे स्‍थानकातून पहिली गाडी सुटली. कोकण रेल्‍वेच्‍या या पहिल्‍याच प्रयत्‍नाला अल्‍प प्रतिसाद मिळाला. अवघ्या पाच गाड्या घेऊन ही गाडी सुटली.

या रेल्वेतून एका वेळी ४० वाहने नेता येणार आहेत. मात्र, पहिल्या दिवशी केवळ पाचच वाहनांचे आरक्षण झाले होते. सुरवातीला किमान १६ गाड्यांचे आरक्षण झाले तरच गाडी सोडण्‍यात येईल कोकण रेल्‍वेने जाहीर केले होते. तरी पाच गाड्या घेऊन गाडी सोडण्‍यात आली.

या सेवेसाठी सिंधुदुर्गात नांदगाव आणि गोव्यात वेर्णे या दोन स्थानकांवरच ही स्थानके ठेवण्यात आली आहेत. गाडीचे आगमन झाल्यावर नांदगाव रेल्वे प्रवासी संघटनेने या रो-रोने आलेल्या प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. प्रवाशांनी कोकण रेल्वेचे आभार मानले. त्यातल्या चार गाड्या नांदगाव स्थानकात उतरल्या तर एक कार वेर्णे स्थानकाकडे रवाना झाली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप चांगला प्रवास झाल्याचे प्रवाशांनी सांगितल. कोलाडऐवजी पनवेलमध्ये कार लोड कराव्यात, अशी सूचना प्रवाशांनी केली आहे.

Comments
Add Comment