Sunday, August 24, 2025

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी जाताना प्रत्येकजण शिर्डीचा प्रसाद सोबत घेऊन जातात. शिर्डी संस्थानच्यावतीने प्रसाद म्हणून लाडू विक्री केली जाते. भाविक हे लाडू आवडीने खरेदी करतात, साधारण २० रुपयामध्ये २ लाडू असलेले पाकीट भाविकांना प्रसाद स्वरूपात दिला जातो. याद्वारे भाविक हवे तितके लाडू घरी घेऊन जाऊ शकतात. मात्र, आता या लाडूंचे दर महाग करण्यात आले आहेत. साईबाबा संस्थानने नुकतेच प्रसाद लाडूचे दर वाढवत ३० रुपये केले आहेत.

शिर्डीचे लाडू देशभरात प्रसिद्ध असून,  साईबाबां संस्थानकडून भाविकांना देण्यात येणारा हा प्रसाद आता महाग करण्यात आला आहे. साईबाबा संस्थानच्या या निर्णयावर अनेक भाविक नाराज असून. यापूर्वी २० रुपयाला मिळणाऱ्या या प्रसादाला ३० रुपये मोजावे लागणार आहे. संस्थानच्या या निर्णयामुळे भाविकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. “भाविकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या विश्वस्त संस्थेने असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संस्थानकडून मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनानंतर मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. मात्र हा तोटा भाविकांकडूनच वसूल करणे योग्य आहे का? असाही सवाल जनसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment