Sunday, August 24, 2025

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

माथेरान : माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळीसुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेच्या निर्णायक मतांच्या आधारावर होणार आहे. या पदासाठी इच्छुकांनी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झालेले नसल्याने आखडता हात घेतल्याचे दिसते. इच्छुकांची कोंडी झाली असून त्यांना जर का नगराध्यक्ष पद भूषवायचे असेल तर वेळप्रसंगी भाजपचे सदस्यत्व स्वीकारावे लागणार आहे किंवा गप्प बसावे लागणार आहे.

कर्जत-खालापूर मतदार संघातील कर्जत आणि खोपोली येथील नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) जागा सोडण्यात येणार असून माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा उमेदवार निश्चित करण्यात येणार असे बोलले जात आहे. माथेरानमध्ये जरी भाजपचे मताधिक्य नसले तरी वरिष्ठांच्या आदेशानुसार याठिकाणी भाजपला सहकार्य करण्यास अन्य सहकारी पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना भाजपच्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार अशी चर्चा आहे.

पदाला साजेसा न्याय देणारे व्यक्तिमत्त्व शिवसेनेच्या शिंदे गटात कार्यान्वित आहेत. परंतु वरिष्ठांनी भविष्यातील मतदार संघातील राजकीय आखणी करून कर्जत आणि खोपोली येथे शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी देणार असून माथेरानमध्ये भाजपचा उमेदवार प्रथम नागरिक येण्याची शक्यता आहे.

नगरसेवक पदासाठीसुद्ध बहुतेक इच्छुकांनी काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या खर्चावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मागील काळात अनेक पक्षप्रवेश करण्यात आलेले आहेत.

Comments
Add Comment