
रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले म्हणून एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रत्नागिरीच्या उद्यमनगरमध्ये घडली आहे.
रेहान अस्लम कापडी (वय १५) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे, जो कॉन्व्हेन्ट शाळेत १० वी अ मध्ये शिकत होता. युनिट टेस्टमध्ये रेहानला कमी गुण मिळाले होते. यावरून त्याच्या आईने त्याच्या पुढील शिक्षणाची आणि भविष्याची चिंता व्यक्त करत त्याला समजावले.
आईच्या या शब्दांनी रेहानच्या मनावर गंभीर परिणाम झाला. त्याने स्वतःला घरातल्या खोलीत कोंडून घेतले आणि पंख्याला गळफास लावून आपले जीवन संपवले. रेहानच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
त्याच्या वडिलांचा व्यवसाय सी-मॅन असून त्याला दोन बहिणी आहेत. एका क्षणाच्या नैराश्यातून घेतलेल्या या निर्णयामुळे एका उज्वल भविष्याचा अंत झाला, तसेच संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. ही घटना शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर येत असलेल्या मानसिक दबावाकडे लक्ष वेधते आणि पालकांना तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित करते.