Friday, October 3, 2025

पाऊस

पाऊस

कथा : रमेश तांबे

एकदा काय झाले काळ्याकुट्ट ढगांनी आकाश भरून आले वारा सुटला सोसाट्याचा उडवत पाचोळा पानाफुलांचा प्राणी पक्षी सावध झाले आकाशात बघू लागले धडाम् धुडूम आवाज झाले आईच्या कुशीत सारे लपले गोठ्यातली वासरे भेदरली पक्ष्यांची पिल्ले घाबरली तेवढ्या टप टप आवाज झाला. कोणीतरी म्हणाले पाऊस आला वासरा पोरांना ठाऊक नव्हते पाऊस म्हणजे काय असते पोरांनी खिडकीत जागा धरल्या वासरांनी माना बाहेर काढल्या सरसर सर पाऊस वाढला ओल्या मातीचा वास आला गाई हंबरल्या पक्षी चिवचिवले पावसाच्या पाण्यात भिजली झाडे माणूस म्हणाला मृदगंध आला पावसाचा महिना आला पावसाचे गाणे गाऊ लागला हातावर पाऊस झेलू लागला वासरांनी गोठे दिले सोडून पाखरांची पिल्ले गेली उडून अंगणात आली छोटी मुले त्यांनी पावसात फेर धरले कुणी आणल्या छत्र्या रंगीत कोणी आले रेनकोट घालून काहीजण मस्त भिजले पावसाच्या पाण्यात मुक्त खेळले गार वारा वाहू लागला पावसाचा जोर खूपच वाढला अंगणात झाले पाणीच पाणी बंद झाली पाऊस गाणी वासरेदेखील गोठ्यात परतली पाखरा पिल्लांची भंबेरी उडाली आता मात्र चमकल्या विजा ढगांचा वाजला बेंडबाजा घाबरून गेले छोटे सारे बंद केली खिडक्या दारे पण पाऊस काही थांबेना काय करावे समजेना! थोड्याच वेळात पाऊस थांबला ढगाआडून सूर्य डोकावला भिजली पाने चमकू लागली मोत्यावाणी दिसू लागली मुलांनी पुन्हा खिडक्या उघडल्या पक्ष्यांनी माना बाहेर काढल्या गायगुरांनी पाणी झटकले जोरजोरात अंग हलवले झाडे सगळी स्वच्छ झाली घराची दारे उघडली गेली मुले पुन्हा अंगणात आली साचल्या पाण्यात खेळू लागली तेवढ्यात ओरडले कोणीतरी अरे वर बघा रे वर बघा आकाशात आले इंद्रधनू सुंदर मोहक इंद्रधनू साऱ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या कोणीतरी शिट्ट्या फुंकल्या कोण म्हणाले ही तर आहे देवाची छत्री दुसरा म्हणाला ही तर आमची घसरगुंडी मुलीने एका मोजले रंग सगळे झाले बघण्यात दंग सगळ्यांना खूप आनंद झाला चेहरा त्यांचा फुलून गेला तेवढ्यात इंद्रधनू गायब झाले ढगांच्या आड सूर्यदेव लपले मुले सगळी हिरमुसून गेली इंद्रधनूला शोधू लागली तेवढ्यात एक दादा आला साऱ्या मुलांना सांगू लागला पाण्याच्या थेंबातून प्रकाश गेला त्यातून इंद्रधनूचा जन्म झाला पाऊस प्रकाश एकत्र येईल तेव्हा पुन्हा इंद्रधनू दर्शन देईल मुलांना त्यातले विज्ञान समजले तेव्हा सारेच कसे छान हसले असा पाऊस सगळ्यांनी अनुभवला मुले, माणसे, प्राणी, पाखरे सगळ्यांनाच त्याने आनंद दिला मुले सारी घरात परतली पुस्तक काढून वाचू लागली जलचक्राचे गुपित समजले ज्ञानामध्ये चिंब भिजले!
Comments
Add Comment