Sunday, August 24, 2025

गणपतीची अनेकविध रूपं

गणपतीची अनेकविध रूपं

डॉ. अंबरीष खरे : ज्येष्ठ अभ्यासक

सध्या अवघे समाजमन गणेशोत्सवाच्या तयारीत गर्क आहेत. लवकरच नेहमीच्या उत्साहात गणेशाचे आगमन होईल. मात्र पूजा करताना ही देवता नेमकी कोण आहे, कालौघात तिची ओळख, स्वरूप कसे बदलत गेले, पुराणे याबद्दल काय सांगतात हेदेखील जाणून घेण्याजोगे आहे. गणपतीबाबतही अनेक संशोधकांनी संशोधन केले असून बरीच माहिती समोर आली आहे. त्या अानुषंगाने घेतलेला वेध.

गणेशाच्या स्वागताची तयारी जवळपास पूर्ण झाली असून भाविक आतुरतेने आपल्या लाडक्या देवतेची वाट बघत आहेत. लवकरच हा आनंदोत्सव सुरू होईल आणि वातावरण भारून जाईल. श्री गणेश हा विघ्नहर्ता, सुखकर्ता आहे. या स्वरूपातच आपण गणेशाचा विचार करतो; परंतु इतिहासाच्या कवाडांमधून याकडे बघता; गणपतीसंदर्भातील आख्यायिका, उपलब्ध असणारी पुराणे, कथा यातून समोर येणाऱ्या माहितीनुसार ही देवता मुळात विघ्नांचा राजा असणाऱ्या ‌‘विघ्नराज‌’ या स्वरूपाची आहे. ‌‘विघ्नेश्वर‌’ हे गणपतीचे नाव सगळीकडे आलेले दिसते. शिव-पार्वतीच्या या मुलाकडे विघ्नांचे आधिपत्य दिले होते. अर्थातच यामुळे तो विघ्नांचा स्वामी झाला. असे असताना विघ्नांपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर गणेशाची प्रार्थना केली पाहिजे आणि विघ्न आणणे तसेच दूर करणे या गोष्टी त्याच्या अधीन आहेत हे ओळखून सेवा केल्यास तो तुम्हाला साह्य करू शकतो हा विचार पुढे आला आणि त्याची उपासना सुरू झाली.

‘विनायक‌’ हे गणपतीचे नाव अनेकदा वापरलेले दिसते. हा देखील अाधिपती असणारा एक देव असून आज आपण त्याला गणेशस्वरूपातच बघतो. पण उत्तर-वैदिक साहित्याच्या उत्पत्तीकाळात, साहित्यग्रंथ तयार होताना मानवगृह्यसूत्र, अथर्ववेदीय शान्तिकल्प यांसारख्या ग्रंथांमध्ये आपल्याला चार विनायकांचे वर्णन सापडते आणि यावरूनच विनायक ही एकच देवता नसल्याचेही समजते. हे विनायक लोकांना ग्रासू शकत असत. झपाटू शकत असत. एखाद्याच्या मागे संकटांचा ससेमिरा लावण्याची, अहित करण्याची, मानसिक अशांती निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. म्हणजेच यांच्या प्रभावाने विद्यार्थ्यांचा विद्याभ्यास होणार नाही, वाण्याचा व्यवसाय होणार नाही, अध्यापकाला आचार्यपद मिळणार नाही असे वर्णन सापडते. अशा प्रकारे झपाटले गेलेल्या व्यक्तीला विचित्र स्वप्ने पडणे, मुंडण केलेले वा जटा वाढवलेले लोक स्वप्नात दिसणे, रस्त्यावर जाताना आपल्या पाठीमागे कोणी तरी येत असल्याचा भास होणे अशी काही लक्षणे दिसतात, अशी माहिती ग्रंथांमध्ये सांगितली आहे.

एखाद्याबाबत असे होत असेल तर त्याला विनायकाने झपाटले असल्याचे समजावे, असे या प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितले आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी विनायकांची शांती करण्याचे सूचित केले आहे. इथे विनायकांना स्नान घालण्याचा म्हणजेच विनायकस्नपन या नावाचा विधीही सांगितला आहे. यात त्यांची स्थापना करून पूजन करणे, विविध प्रकारचे नैवेद्य दाखवणे, अग्नी प्रज्वलित करून त्यात आहुती देणे असा पूजाविधी सांगण्यात आला असून हे केल्यास विनायक प्रसन्न होतात आणि त्रास देत नाहीत, असे सांगत आश्वस्त करण्यात आले आहे.

वेदांमधील ‌‘गणानां त्वा गणपत हवामहे‌’ ही एक प्रसिद्ध ऋचा आपल्याला माहिती आहे. याच ऋचेमध्ये ‌‘ज्येष्ठराज‌’ असा एक शब्द येतो. यावरून ‌‘ज्येष्ठा‌’ नावाच्या देवतेचा प्रमुख वा तिच्याशी संबंधित असणारा असा हा गणपती आहे का? असा प्रश्न संशोधकांनी उपस्थित केला आहे. ‌‘ज्येष्ठा‌’चा अर्थ थोरली किंवा मोठी. ज्येष्ठागौरी आपल्याला माहीत आहे, ती अलक्ष्मीचे प्रतीक म्हणून. लक्ष्मी असते तेथे अलक्ष्मी नसते हेही आपण जाणतो. आजही गावांमध्ये ‌‘अक्काबाईचा फेरा आला‌’ अशा पद्धतीचे शब्दप्रयोग असतात. ही अक्काबाई म्हणजे अलक्ष्मी असते. म्हणजेच अलक्ष्मी येते आणि तुमच्याकडील सगळे धनधान्य, संपत्ती, आरोग्य घेऊन जाते, अशी एक कल्पना आपल्याकडे दिसते. ‌‘ज्येष्ठा‌’ अशी असेल तर विनायकाशी तिचा संबंध असण्याचा विचार सुसंगत वाटतो. थोडक्यात, या त्रासदायक देवता आहेत पण पूजा केली तर त्यांचा लोभ राहतो आणि तुमचे कल्याण होते, त्रास होत नाही अशा स्वरूपाचा विचार वा देवतांचे असे स्वरूप प्राचीन काळी असावे. त्यामुळे ज्येष्ठा गौरीचे आगमनही एरवी वाईट मानल्या जाणाऱ्या मूळ नक्षत्रावर होते. या दोन्ही देवता भाद्रपदातच पूजल्या जातात. अनेक अभ्यासक या सगळ्याचा, संबंधित पुराणकथांचा, प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासातून समोर येणाऱ्या विषयांचा अभ्यास करत असतात.

पुराण वाङ्मयाच्या पुढच्या काळातही आपल्याला गणपतीच्या कथा आढळतात. पण इथे थोडी गंमत दिसते. जसे की, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये आधी उल्लेख केल्याप्रमाणे चार विनायक नसून ही सर्व नावे एकाच विनायकाची आहेत आणि त्याचे पूजन केले असता सर्व विघ्नांमधून मुक्ती मिळते, हा विचार समोर आलेला दिसतो. मधल्या काळात झालेला हा बदल विचारात घेण्याजोगा आहे. त्यामुळेच या काळात विघ्ने दूर करण्यासाठी विनायकाचे पूजन करण्यास सांगितले गेल्याचे दिसते. गणपतीच्या जन्माच्या गोष्टी प्राचीन ग्रंथांमधून समजतात आणि तो गजमुख असणारा देव असल्याचेही समजते. मात्र आधीच्या चार विनायकांचे सविस्तर वर्णन आपल्याला उपलब्ध नाही. त्यामुळेच ते गजमुख होते की नाही, त्यांचे स्वरूप नेमके कसे होते हे सांगता येत नाही. पण पुराणकथांमधून गणपतीची मूर्ती मात्र स्पष्ट होत जाते. त्याला किती हात आहेत, डोके कसे आहे, हातात कोणकोणती आयुधे आहेत हे सगळे वर्णन या कथांमध्ये केलेले दिसते. प्राचीन काळच्या गणेशमूर्ती भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही सापडतात. अफगाणिस्तानमधील गार्देझ येथील उभ्या गणेशाची मूर्ती प्रसिद्ध आहे. शिव आणि ब्रह्मदेवाने त्याला गणांचा अाधिपती केले आणि तो मुख्य झाला, पूजनात त्याचे अग्रमानांकन ठेवण्याची पद्धत पडली, हेदेखील पुराणांमधून समजते. विघ्न आणण्याची ताकद असणाऱ्या देवतेचे पूजन पहिल्यांदा करून त्याला शांत केले तर पुढचे कार्य चांगल्या प्रकारे पार पडेल, असा विचार त्यामागे दिसतो. अशा प्रकारे हळूहळू गणेशाविषयीचे विचार बदलत गेल्याचे आपण समजून घ्यायला हवे.

नंतरच्या काळात गणेशाचे पूजन करणारा ‌‘गाणपत्य‌’ हा एक संप्रदाय प्रसिद्ध झाला. आपल्याकडे पंचायतन पूजा असते. त्यात एक देवता मध्यभागी तर चारही बाजूंनी चार देवता असतात. शिव, विष्णू, सूर्य, गणेश आणि देवी (अन्नपूर्णा) अशा पाच देवतांचे यात पूजन असते. हे पूर्वापार प्रचलित होते. पण आदिशंकराचार्यांनी याचा जास्त प्रसार केला. त्यामुळे याचे श्रेय त्यांना दिले जाते. यामागचा त्यांचा विचार महत्त्वाचा होता. तो म्हणजे तुम्ही शैव असाल तर शिव मध्यभागी ठेवा आणि उरलेल्या चार देवतांचीही पूजा करा. यातून अन्य देवतांचा द्वेष करण्याचे काही कारण नाही, हा विचार मांडला असावा. गणेशाला प्रधान मानणारे लोक गाणपत्य असतात. पंचायतानाही गणेश आहे, हे लक्षात घेण्याजोगे आहे. त्यानंतरच्या काळात गाणपत्य संप्रदायातही वेगवेगळे संप्रदाय तयार अथवा उपपंथ तयार झाले. खेरीज गणेशपुराण आणि मुद्गल पुराण ही दोन पुराणे पूर्णपणे गणेशाशी संबंधित असून आपल्याला माहीत असणारी बरीचशी स्तोत्र, पूजाविधी, वेगवेगळ्या आख्यायिका, कथा यांचा मुख्य स्रोत ही दोन पुराणेच आहेत.

आपल्याकडे तंत्रमार्ग होता. यातही गणपतीची उपासना केली जात असे. गणपतीचे ‌‘एकदंत‌’ हे एक स्वरूप आहे. दुसरा दात परशुरामाशी झालेल्या युद्धात तुटला होता. त्यासंबंधीच्या कथाही आपल्याला माहीत आहेत. एकदंत स्वरूपातील गणेश महागणपती म्हणून ओळखला जातो. सृष्टीची निर्मिती करणारे आदितत्त्व या स्वरूपात त्याच्या या रूपाकडे काही परंपरांमध्ये पाहिले जाते. म्हणजेच ब्रह्मदेवाची निर्मितीही महागणपतीने केली, असे मानले जाते. असाच ‌‘हरिद्रा गणपती‌’ आहे. विशेषत: याच गणपतीची पूजा करणारा एक संप्रदाय होता. त्या काळी गणपतीचा चेहरा आणि एक दात असा एक लोखंडी ठसा असायचा. तो तापवून हा ठसा अनुयायाच्या हातावर उमटवला जायचा. अशा प्रकारे हा शिक्का ते अभिमानाने अंगावर मिरवत असत. गणपतीची उपासना करणारे असेही लोक होते. याचप्रकारे वाममार्ग या पद्धतीनेही गणपतीची पूजा करण्याचा प्रघात होता. ‌‘उच्छिष्ट‌’ गणपती हे त्याचे एक स्वरूप दिसते. इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे तंत्रामध्ये जातीपातीला महत्त्व नाही. स्त्री-पुरुष असा भेद केला जात नाही. त्यामुळे सर्व लोक या उच्छिष्ट गणपतीची पूजा करत असत. त्याला मद्य, मांस, मत्स्य यांचा नैवेद्य दाखवला जात असे.

संपत्ती वा ऐश्वर्य प्राप्त व्हावे म्हणूनही गणपतीची पूजा केली जात असे. एरवी आपण त्याला बुद्धीची देवता समजतो; परंतु संपत्ती प्राप्त होण्यासाठीही त्याची पूजा करण्याचे काही विधी आपल्याला सापडतात. ‌‘संतान गणपती‌’ पुत्रप्राप्तीच्या हेतूने पूजला जातो. या सगळ्यांवरून गणेश ही देवता सगळीकडे प्रचलित होती, हे स्पष्ट होते. प्राचीन काळी तो विघ्नांचा अाधिपती होता, पण कालौघात सुख, संपत्ती, संतान असे सर्व काही देणारा, सकलदाता असा देव ठरला. या देवतेचा सगळा प्रवास जाणून घेणे, त्याची ‌‘सगळ्या मनोकामना पूर्ण करणारा देव‌’ अशी ओळख बनणे हे सगळेच अभ्यासण्याजोगे आहे. भाद्रपद आणि माघ महिन्यातील चतुर्थींना गणेशाचा उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो. पार्थिव याचा अर्थ मातीपासून बनवलेला. या पार्थिव गणपतीचे पूजन विशेषकरून भाद्रपदात केले जाते. मातीच्या गणपतीची पूजा हे भाद्रपदातील पूजेचे वैशिष्ट्य होय. आता हाच उत्सव आपण साजरा करणार आहोत. तेव्हा या उत्सवाची जोमाने तयारी पूर्ण करू या आणि पूजन करून गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करू या!

Comments
Add Comment