Sunday, August 24, 2025

मनाची वाढती दशा

मनाची वाढती दशा

आरती बनसोडे

अचानक चालता-बोलता हसणारा राघव (नाव काल्पनिक आहे) आज आपल्यात नाही ही सत्यता खूप विचलित करणारी आहे. त्याने आत्महत्या केली होती. राघव शिक्षण पूर्ण करून नोकरी शोधत होता. वरून तर नेहमी आनंदी दिसायचा, कोणाला वाटले देखील नसेल की तो असे जीवन संपवेल.

खरंच आजची परिस्थिती खूप भयानक झाली आहे. कोणाच्या मनात नक्की काय भावना सुरू आहे याचा शोध घेणे अशक्य झाले आहे. कारण मानव हा सामाजिक प्राणी आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया हा त्याच्या भावनांमध्ये दडलेला असतो. भावना म्हणजे काय? तर मनाच्या अतिशय सूक्ष्म आणि जिवंत हालचाली. आपण कधी आनंदित होतो, कधी दुःखी, कधी रागावतो-चिडतो, कधी गहिवरतो, भांडतो - हे सगळं म्हणजेच भावना. मानवी भावना ही प्रत्येकाच्या जीवनाची एक अविभाज्य बाजू आहे. ती केवळ आपल्या मानसिक अवस्थेचं प्रतिबिंब नसते, तर आपल्याला सामाजिक, शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून आकार देणारा घटक असते. बालपणापासूनच आपण भावना अनुभवायला लागतो. आईच्या मिठीतला सुरक्षितपणा, वडिलांचा राग, शिक्षकांचं कौतुक, मित्रांची साथ - हे सगळं भावनांचंच तर रूप आहे. भावना आपल्याला जोडतात, दूर नेतात, संवाद घडवतात आणि कधीकधी दुरावा सुद्धा निर्माण करतात. आपल्या जीवनात यश, अपयश, प्रेम, मैत्री, दुःख, क्रोध, आशा - या साऱ्या भावना प्रत्येक क्षणी बदलत असतात.

पण भावनांना योग्य प्रकारे ओळखणं आणि व्यक्त करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. अन्यथा त्या भावना आतल्या आत साचून तणाव, नैराश्य यांसारख्या मानसिक समस्या निर्माण करू शकतात. आजच्या काळात, भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) हे एक महत्त्वाचं कौशल्य मानलं जातं. म्हणजेच, स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखणे, समजून घेणे आणि त्यावर योग्य प्रकारे प्रतिक्रिया देणे. भावना या कमजोरी नाहीत, तर त्या आपल्या मानवतेचं प्रतिबिंब आहेत. यामुळेच, आपण जर आपल्या भावना ओळखू, स्वीकारू आणि योग्यरितीने व्यक्त करू शकलो, तर आपण एक सशक्त, संवेदनशील आणि समजूतदार व्यक्ती बनू शकतो. भावना आपल्याला माणूस बनवतात. भावना म्हणजे मनाचा आवाज. त्या नाकारू नका, दडपून टाकू नका – त्यांना समजून घ्या, स्वीकारा आणि योग्यरीत्या, योग्य साधनाने व्यक्त व्हा. नाही तर मनाचा कोंडमारा होऊन मानसिक आरोग्य धोक्यात यायला वेळ लागणार नाही. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मानसिक ताणतणाव ही एक सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना कधीना कधी ताणतणावाला सामोरे जावे लागते. पण या ताणतणावाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खोल परिणाम होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. मानसिक ताणतणाव म्हणजे आपल्या मनावर एखाद्या प्रसंगामुळे, जबाबदाऱ्या, अपयश, भीती, चिंता यामुळे येणारा आतल्या आतचा तणाव. तो कधी मानसिक असतो, तर कधी शारीरिक लक्षणांमध्येही दिसून येतो. हा तणाव सामोरे जाताना आपल्या मनामध्ये अनेक भावना उत्पन्न होतात. त्यामध्ये अनेक कारणे जसे की अभ्यासाचा किंवा कामाचा ताण, परीक्षेचा दबाव, कौटुंबिक कलह, आर्थिक अडचणी, भविष्याची भीती, सततची तुलना आणि अपयश, सामाजिक मीडिया आणि लोकांचं मत या सगळ्यांमुळे भावनांची गुंतागुंत होते. मोबाइल, सोशल मीडिया आणि सततची ऑनलाइन उपस्थिती यामुळे खरे मानवी संवाद कमी झाले आहेत आणि माणूस आभासी जगात अडकत चालला आहे. स्पर्धात्मक जीवनशैली, शाळा, कॉलेज, करिअर, नाती - सर्वच ठिकाणी सततची तुलना आणि यशाच्या मागे धाव - यामुळे आत्ममूल्य कमी होतं आणि मनात असुरक्षितता वाढते. भावना व्यक्त करण्याबाबत समाजातील समज-गैरसमज जसे की आजच्या समाजात “तू मुलगा आहेस, रडू नकोस”, “भावना व्यक्त केल्यास कमजोर समजतील” असे विचार पसरलेले आहेत. त्यामुळे माणूस भावना दडपतो आणि मनात क्लेश निर्माण होतो. आजकालच्या झपाट्याने बदलणाऱ्या नात्यांमुळे लोकांना भावनिक आधार मिळत नाही. त्यामुळे ते अंतर्मुख, एकटे आणि तणावग्रस्त होतात. सतत बदलणारे हवामान, नोकरीतील अनिश्चितता, आरोग्याच्या समस्या यामुळे मनावर ताण येतो आणि भावनिक अस्थिरता वाढते.

त्यामुळे भावना योग्य रीतीने व्यक्त होणे गरजेचे आहे. भावना व्यक्त केल्याने मन हलकं होतं. मनावरचं ओझं हलकं होतं, मन मोकळं राहतं आणि विचार स्वच्छ होतात. आपले नातेसंबंध दृढ होतात. आई-वडील, मित्र, जोडीदार यांच्याशी आपले संबंध अधिक विश्वासपूर्ण आणि घट्ट होतात. स्वत:चं मानसिक आरोग्य सुधारतं. दडपून ठेवलेल्या भावना नैराश्य, चिंता, चिडचिड, तणाव याला कारणीभूत ठरतात. त्या व्यक्त केल्याने आपण मानसिक दृष्टिकोनातून सशक्त होतो. भावना बोलून दाखवल्याने गैरसमज टळतात आणि आपला संवाद पारदर्शक होतो.

ज्या प्रमाणे प्रेशर कुकरमधला दबाव वाढल्यानंतर शिटी वाजते आणि आतला ताण बाहेर काढला जातो जेणेकरून नवीन दबाव सहन करण्याची कूकरमध्ये क्षमता तयार होते त्याचप्रमाणे आपल्या मनात अनेक प्रकारचा ताण अणि दबाव तयार होतो जो योग्य वेळी योग्य पद्धतीने बाहेर काढणे गरजेचे असते. असे न केल्यास हळूहळू आपल्याला त्याचा मानसिक त्रास व्हायला लागतो जो दिसून येत नाही.

योग, ध्यान, प्राणायाम, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार, जिवलग व्यक्तीशी मन मोकळं करणं, समस्या, तोंड देण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, सतत सोशल मीडियावर असणं टाळणं, हसणं आणि विरंगुळा घेणं यामुळे देखील भावना नियंत्रणात ठेवता येतात. आपुलकीने बोलणं, लेखन (डायरी, कविता, कथा), कला (चित्रकला, नृत्य, संगीत), सकारात्मक हावभाव व देहबोली, दुसऱ्यांसाठी मदतीची किंवा प्रेमाची कृती, समोरच्या व्यक्तीला माफ करणं आणि प्रेमाने वागणं यामुळे भावनांना वाट मिळते. भावना योग्य तर्हेेने व्यक्त न केल्यास डोकेदुखी, झोपेच्या तक्रारी, रक्तदाब वाढणे, भूक मंदावणे किंवा वाढणे, उदासी, चिडचिड, नैराश्य, शारीरिक थकवा, एकटेपणा, श्वासोच्छ्वासात बदल, हृदयाचे ठोके वेगाने होणे, आत्मविश्वास कमी होणे, संबंध ताणले जाणे, अनावश्यक राग किंवा अश्रू यासारख्या आजारात परावर्तित होतात. मानसिक ताणतणाव टाळता येत नाही, पण त्याचं व्यवस्थापन शक्य आहे. तणावाकडे दुर्लक्ष न करता त्याला वेळेत ओळखणं आणि उपाय करणं हेच संपूर्ण आरोग्याचं रहस्य आहे. मन शांत आणि शरीर सशक्त असेल, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो.

लेखक : मानसिक समुपदेशक, मुंबई

Comments
Add Comment