Sunday, August 24, 2025

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. मालवणच्या दिशेने निघालेली एम.एच. ०२ एफ. जी. २१२१ ही लक्झरी बस मुंबईहून प्रवास करत असताना अचानक आग लागली. बसचे मालक ओमकार मागले असून, वाहन चालक सचिन लोके यांनी तत्परता दाखवत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मध्यरात्री 2:10 वाजता कशेडी बोगद्याच्या सुरुवातीस असणाऱ्या पुलावर अचानक आग लागली.गाडीचा टायर फुटल्याने ही आग लागली.

या घटनेनंतर क्षणातच ज्वाळांनी संपूर्ण बसला वेढा घातला आणि आगीचा भडका उडाला. चालकाने प्रसंगसंवधानता राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस आणि खेड व महाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले असले तरी बस जळून खाक झाल्याने नागरिकांचे सर्व सामान देखिल जळून गेले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment