Sunday, August 24, 2025

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण यशस्वी झाल्याचे इस्रोने सांगितले.

एअर ड्रॉप चाचणीत पॅराशूटच्या मदतीने अंतराळयानाचा वेग कमी करण्याचे तंत्र वापरण्यात आले. या चाचणीत हवाई दल, डीआरडीओ, नौदल आणि तटरक्षक दल सहभागी झाले. परस्पर समन्वयातून ही चाचणी यशस्वी झाल्याचे इस्रोने जाहीर केले.

गगनयान मोहिमेसाठी इस्रोने रॉकेट तयार केले आहे. या रॉकेटची जमिनीवर यशस्वी चाचणी झाली. इस्रोने अंतराळ यानासाठी क्रू मॉड्युल आणि सर्व्हिस मॉड्युलसाठीचे इंजिन तयार केले असून त्याची चाचणीही यशस्वी झाली आहे. क्रूच्या रक्षणासाठी पाच प्रकारच्या मोटर तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व मोटरच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. मोहिमेसाठी नियंत्रण कक्ष, मुख्य केंद्र, क्रू प्रशिक्षण केंद्र, लाँच पॅड सज्ज आहे. मानवविरहीत क्रू मॉड्युल आणि सर्व्हिस मॉड्युल तयार आहे. या मॉड्युलच्या सुरुवातीच्या काही चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. क्रू ला परत आणण्यासाठीचे उपकरण आणि योजना तयार असल्याची माहिती इस्रोने दिली.

गगनयान मोहिमेद्वारे इस्रो भारताचे अंतराळ क्षेत्रातले सामर्थ्य वाढवणार आहे. नियोजनानुसार इस्रो २०३५ पर्यंत अंतराळात देशाचे पहिले अंतराळ स्थानक उभारणार आहे. तसेच २०४० पर्यंत पहिला भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरवण्याचे नियोजन आहे.

भारताच्या प्रस्तावीत अंतराळ स्थानकाचे एकूण पाच भाग असतील. यातील पहिल्या भागाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. चांद्र मोहिमेसाठी रॉकेट आणि इतर यंत्रणाच्या विकासाचे काम वेगाने सुरू आहे. गगनयान आणि चांद्र मोहिमेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत. गगनयानसाठी प्रशिक्षण सुरू आहे.

Comments
Add Comment