Sunday, August 24, 2025

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५ लाखांच्या भव्य दहीहंडी उत्सवात घडलेल्या अपघातात पवईतील गोविंदा पथकातील आनंद सुरेश दांडगे (वय 26) गंभीर जखमी झाला होता. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दिनांक 16 ऑगस्ट रोजी झालेल्या या दहीहंडी उत्सवात पवईच्या गोखले नगर गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. आनंद दांडगे हा चौथ्या थरावर चढला असताना, "तीन एक्के" घेऊन खाली उतरताना तोल गेल्याने तो थेट खाली कोसळला. या अपघातात त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली होती.

त्याला तत्काळ कन्नमवार नगर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढे विक्रोळीतील सुश्रुषा रुग्णालयात हलवण्यात आले.

गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2.31 वाजता डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले.मृत्यूची बातमी कळताच दांडगे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरातील नागरिकांनीही शोक व्यक्त केला आहे.

या प्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह राजावाडी रुग्णालय, घाटकोपर येथे पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा अपघाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुंबईत यावर्षीचा दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला असला तरी त्यात तब्बल 318 गोविंदा जखमी झाले. तर दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर विक्रोळीत झालेल्या दुर्घटनेमुळे ही संख्या तीन वर गेली आहे.

Comments
Add Comment