
मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईकर कोकणवासीय गावाकडे निघाला असून रायगड जिल्ह्यात इंदापूर आणि माणगाव शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
मुंबई गोवा महामार्गात वाहतूक पोलिस तैनात आहेत. रविवार असल्याने मुंबई गाव महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हजारो वाहने कोकणाच्या दिशेने निघाली आहेत.
गणेशभक्तांच्या सेवेसाठी पोलिस प्रशासन देखील सज्ज झालं असून रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर होणारी सततची वाहतूक कोंडी रोखण्याकरीता महामार्गावर नागोठणे, कोलाड, इंदापूर माणगाव, लोणेरे, लाखपाले परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक कंट्रोल अधिकारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये याकरिता पोलिस हातात कंट्रोल फोन घेऊन फेरफटका मारत आहेत.
मात्र मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरणाचे काम, महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे याचा फटका चाकरमान्यांना सहन करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव परिसरात प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या.
तसेच इतर तीनही महामार्गावर वाहतूक संथगतीने सुरू होती. यामुळे चाकरमान्यांना नियोजित स्थळी पोहचण्यास उशीर झाला. रेल्वे स्थानक, एसटी डेपो आणि खासगी बस थांब्यांवर गणेशभक्तांनी कोकणात जाण्यासाठी प्रचंड गर्दी आहे.