
आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून कोकणकर गावाला निघाले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचे ठाणे रेल्वे स्थानकात मोठ्याप्रमाणावर हाल झाले आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकांत कोकणवासियांनी 24 तास आधीपासून रांगा लावल्या आहेत.रात्री मांडवी एक्स्प्रेस पकडण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात जनरल डब्यात चढण्यासाठी भलीमोठी रांग लागली होती. ठाणे रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक सातवर मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी मोठी रांग लागली होती. काही प्रवाशांनी 24 तास आधी येऊनच रांग लावली होती.
ठाणे स्थानकात थांबणाऱ्या कोकणात जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्या जर बघितल्या तर कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, कोकण विशेष एक्सप्रेस या गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात कोकणवासियांची प्रवास करण्याची इच्छा असते. मात्र, त्याच गाड्यांना प्रचंड गर्दी ही बघायला मिळत आहे.
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हाल सुरू आहेत. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ७ वर कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधुन प्रवास करण्यासाठी रांग लावण्याऐवजी प्रवाशी आपल्या कुटुंबासह फलाटावरच बस्तान मांडून आहेत.
गणपतीच्या काळात कोकणासाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येतात. गणपतीचे आगमन 27 ऑगस्टला होणार आहे. त्यापूर्वी आपापल्या गावी जाण्यासाठी कोकणवासियांची लगबग सुरु आहे.