मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या राजाचं पारंपरिक फोटो सेशन थाटात पार पडलं, ज्यामुळे भक्तांना त्यांच्या लाडक्या राजाचं पहिलं दर्शन झालं.
यावर्षी लालबागच्या राजाचा दरबार एका वेगळ्याच वैभवाने नटलेला आहे. यंदाचा गणपती बाप्पा तिरुपती बालाजीच्या सुवर्ण राजमुकुटात विराजमान झाला आहे. त्यासाठी खास 'सुवर्ण गजानन महाल' साकारण्यात आला आहे. राजाची वात्सल्यमूर्ती सोन्याच्या अलंकारांनी सजवली आहे. सुवर्ण पाऊलांपासून ते सुवर्ण राजमुकुटापर्यंत राजाचा हा राजेशाही थाट खरंच डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.
मंडळाने यंदा एक नवा विक्रम केला आहे. प्रथमच, लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची तब्बल ५० फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे राजाचं रूप अधिकच भव्य आणि विलोभनीय वाटत आहे. लेझर लाईट्सच्या रोषणाईने हे पहिलं दर्शन अधिकच आकर्षक झालं आहे. गणेशोत्सवाच्या काळात राजाच्या दर्शनासाठी २४ तास भक्तांची अफाट गर्दी असते, म्हणूनच मीडिया प्रतिनिधींसाठी हे खास फोटो शूट आयोजित करण्यात आलं होतं. या पहिल्या दर्शनानेच गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे.