Sunday, August 24, 2025

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. बीडच्या मांजारसुंबा येथे झालेल्या बैठकीअंती जरांगेंनी राज्य शासनाला इशारा दिला. याप्रसंगी कार्यकर्त्यांशी बोलताना जरांगेंनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. आंदोलनात जाळपोळ किंवा दगडफेक करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करा; असे जरांगेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.

एकही मराठ्याची अस्सल अवलाद माघारी जाऊ शकत नाही. तुम्ही गर्व वाटावं असं काम करत आहेत. बीडचं हे नुसतं रुप बघून सरकारला रातभर झोप राहणार नाही. बेजार होणार. चलो मुंबई. २९ ऑगस्टला जमून फाईटच आहे. काय मराठ्यांची अवलाद आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो. आपल्याला शांततेत जायचं आहे आणि शांततेत आंदोलन करायचं आहे; असं मनोज जरांगे म्हणाले.

आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. मुंबईला येण्याची हौस नाही. पण लेकराबाळांसाठी यावं लागतंय. २९ ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. २७ ऑगस्टला सकाळी दहा वाजता आंतरवलीतून मुंबईला निघायचं. समाजाला डाग लागेल असं पाऊल उचलायचं नाही. कुणी दगडफेक आणि जाळपोळ करायची नाही", असंही मनोज जरांगे म्हणाले.

'आता फक्त बीडमध्ये डीजे वाजूदे मग सांगतो'

बीडच्या मांजारसुंबा येथे जरांगेंच्या सभेसाठी आयोजकांनी डीजे वाजवण्यासाठी परवानगी मागितली होती. पण त्यांची मागणी डीवायएसपींनी मान्य केली नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात डीआवयएसींना इशारा दिला. 'मला आणि माझ्या समाजाला डीजे वाजू दिला नाही म्हणून काय अडचण नाही. पण डीवायएसपी साहेबांना एकच सांगतो, सत्ता येत असते आणि जात असते. सत्ता बदलत असते. मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे, माझ्या डोक्यात जो एकदा बसला त्याचा बाजार उठवतो. धमकी देत नाही. समजून सांगतो. बीड जिल्ह्यात दुसऱ्या कुणाचा डीजे वाजू देत. मग सांगतो तुम्हाला. डीजेमध्ये काय दहशतवाद्यांच्या बंदूक आहेत का ?' असे मनोज जरांगे म्हणाले.

Comments
Add Comment