
युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन
पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाअंतर्गत पालघर, जिल्ह्यातील उमेदवारांना इस्रायल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इस्रायलमध्ये घरगुती सहाय्यक या क्षेत्रात युवक युवतींना ५ हजार रोजगार उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या व २५ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी निपुण ,पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग आणि पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
इस्रायलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप केले जाणार आहे. तसेच नियुक्त्यांकडून मेडिकल विमा, राहण्याची आण जेवणाची सोयही असणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली माहिती भरावी.