रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी ताफा लवकरच प्रदूषणमुक्त ई-बसेसनी सज्ज होणार आहे.
पहिल्या टप्प्यात ३० ई-बसेस रत्नागिरीच्या रस्त्यांवर धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
डिझेलच्या खर्चाला पर्याय म्हणून ई-बसेसबरोबरच सीएनजी बसेसचा वापरही वाढवण्यात आला आहे. रत्नागिरी विभागासाठी ६० नवीन सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. तर याआधीच चिपळूण विभागाला ३० सीएनजी बसेस मंजूर झाल्या आहेत. सीएनजी बसेस १ किलो सीएनजीमध्ये ४ किमी अंतर पार करू शकतात आणि त्यांची क्षमता २८० किमीपर्यंत आहे.
ई-बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिले चार्जिंग स्टेशन रत्नागिरीतील विभागीय कार्यशाळेत तयार होत आहे. पुढील टप्प्यात खेड आणि दापोली आगारांमध्येही अशी चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.
चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर या ३० ई-बसेस टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल केल्या जाणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवशाही, स्लीपर आणि सिटी अशा सुमारे ७२० बसेस धावत आहेत.