Sunday, August 24, 2025

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या घेतल्या. ओडिशाच्या किनाऱ्यावर या चाचण्या घेण्यात आल्या. स्वदेशी क्विक रिअ‍ॅक्शन सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र, प्रगत अतिशय कमी पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली, आणि उच्च-शक्तीचे लेसर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र यांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचण्यासाठी डीआरडीओच्या संपूर्ण टीमचे तसेच या प्रकल्पाशी संबंधित सर्व खासगी आस्थापनांचे अभिनंदन केले.

भारताच्या स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेच्या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओ तसेच या प्रकल्पाशी संबंधित सर्व खासगी आस्थापनं आणि भारतीय सैन्य यांचे अभिनंदन करतो, अशी एक्स पोस्ट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेच्या यशस्वी चाचणीमुळे देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता सक्षम होण्यास आणखी मदत होणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. शत्रूकडून असलेल्या सर्व प्रकारच्या हवाई हल्ल्यांच्या धोक्यापासून देशाचे रक्षण करणे तसेच शत्रूचा यशस्वीरित्या मुकाबला करणे या हेतूंसाठी स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणा विकसित केल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

देशाच्या स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेत स्वदेशी क्विक रिअ‍ॅक्शन सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र, प्रगत अतिशय कमी पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली, आणि उच्च-शक्तीचे लेसर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र आहेत. या यंत्रणेच्या मदतीने शत्रूचे विमान, रॉकेट, क्षेपणास्त्र, ड्रोन आदी स्वरुपाचे हवाई हल्ले आकाशातच नष्ट करणे तसेच शत्रूवर आकाशातून प्रतिहल्ला करणे शक्य होणार आहे.

Comments
Add Comment