
कथा : प्रा. देवबा पाटील
सूर्यावर हायड्रोजन व हेलियममध्ये सतत रासायनिक प्रक्रिया होत असल्यामुळे त्या प्रक्रियांमध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. त्यामुळे सूर्यावर सतत स्फोट होत असतात. सूर्यावरील या स्फोटांमुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्यांना सौरवारे किंवा सौरवात असे म्हणतात.
सुभाष आता आदित्यच्या समूहाचा एक सदस्य मित्र बनला होता. आदित्य व त्याच्या मित्रांनासुद्धा सुभाषची मैत्री आवडत होती कारण त्यांना त्याच्याकडून रोज मधल्या सुट्टीत सूर्याबद्दलचे ज्ञान मिळत होते. “आपल्या पृथ्वीवर जसे वादळवारे होत असतात तसे सूर्यावरसुद्धा होतात का गड्या?” मोन्टूने प्रश्न केला. सुभाष म्हणाला, “सूर्यावर हायड्रोजन व हेलियममध्ये सतत रासायनिक प्रक्रिया होत असतात व त्या प्रक्रियांमध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होत असते. त्यामुळे सूर्यावर सतत स्फोट होत असतात. सूर्यावरील या स्फोटांमुळे तेथे वारे निर्माण होतात. त्यांनाच सौरवारे किंवा सौरवात असे म्हणतात. हे वारे म्हणजे सौरकणांचा एक झोतच असतो व तो सतत वाहत असतो. सूर्यावरील स्फोट जास्त जोराने झाल्यास त्या वाऱ्यांना खूप वेग येतो व ते अतिशय जोराने वाहतात. त्यांनाच सौरवादळे असे म्हणतात.” “या सौरवातांचा आपल्या पृथ्वीवर काही परिणाम होतो का?” पिंटूने विचारले. “सूर्यावर होणाऱ्या या कमी-जास्त स्फोटांमुळे आपली पृथ्वीसुद्धा प्रभावित होत असते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात व चुंबकीय क्षेत्रावरही त्यांचे परिणाम होत असतात. सौरवातातील इलेक्ट्रॉन्स हे वातावरणाच्या वरच्या भागात ओझोनची निर्मिती करतात,” सुभाष उत्तरला. “शास्त्रज्ञांच्या मते सूर्यावर डाग आहेत. ते कशाचे असतील काही कल्पना आहे का तुला?” आदित्यने विचारले “सूर्य अत्यंत उष्ण असा अतिशय मोठा तारा आहे. सूर्यावर काळे डाग दिसतात. त्याचे कारण म्हणजे त्याच्या सर्वच पृष्ठभागाचे तापमान हे सारखेच असते असे नाही. ज्या भागाचे तापमान जास्त असते तो भाग अत्यंत तेजस्वी दिसतो व ज्या भागाचे तापमान किंचितसे आजूबाजूच्या भागापेक्षा कमी असते तो भाग थोडासा काळसर दिसतो. सूर्यावरील या काळ्या डागांनाच सूर्याचे डाग किंवा सौरडाग अथवा सौर कलंक असे म्हणतात. या डागांतील वायूंचे रेणू आपापसात किंचितसे दुरावल्याने सूर्यगर्भापासून थोडेसे दूर जातात व त्यामुळे ते भाग त्यांच्या बाजूच्या भागांच्या मानाने थोडेसे थंडही होतात. त्यामुळे त्यांपासून प्रकाशक्षेपण म्हणजे प्रकाशाचे उत्सर्जन कमी होते म्हणून ते थोडेसे काळसर दिसतात.” सुभाषने सांगितले. “पण ते डाग कशामुळे होतात याबद्दल तू काहीच सांगितले नाही?” आदित्यने पुन्हा त्याला प्रश्न केला. सुभाष म्हणाला, “सूर्यावर सतत विद्युत चुंबकीय वादळे होत असतात. ते आपसात सतत घुसळत असतात. त्यामुळे सूर्यावरच्या काही ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्रांना पीळ पडत जातो. त्यांनी सूर्यावर डाग पडतात असे शास्त्रज्ञ सांगतात. या सौरडागांची संख्या नियमितपणे कमी - जास्त होत असते. दर अकरा वर्षांच्या काळात सौर डागांची संख्या कमी-जास्त होण्याचे एक चक्र पूर्ण होते. हे सौरडाग सूर्यावरील आपले स्थानही बदलतात. सूर्यावरील काही डागांची लांबी ही नव्वद हजार ते दीड लाख मैल तर रुंदी ही साठ हजार मैल असते. काही डाग हे गटागटाने एकत्र असतात. त्यांचे आकारही वेगवेगळे असतात. हे डाग अवकाशात ऋण भारित इलेक्ट्रॉन्सचे प्रकाशझोत फेकतात.” “या सौरडागांचा आपल्या पृथ्वीवर काही परिणाम होतो का?” पुन्हा आदित्यनेच प्रश्न केला. “ सूर्यावरील डागांचा पृथ्वीवरही परिणाम होतो. सूर्याच्या ज्या भागावर डाग वाढले त्या समोरील पृथ्वीच्या भागात प्रचंड चुंबकीय वादळे निर्माण होतात. पृथ्वीवरील वादळांची तीव्रता ही डागांच्या प्रमाणात असते. जेवढे डाग जास्त तितकी वादळे जास्त होतात. या वादळांमुळे विद्युत पुरवठ्यात खंड पडू शकतो, विद्युत उपकरणे बिघडू शकतात, रेडिओ, टीव्ही प्रक्षेपण, इंटरनेट बंद पडू शकते. आपल्या उपग्रहांचे आयुष्य कमी होऊ शकते, त्यांचा पृथ्वीशी संपर्क तुटू शकतो. ओझोन वायूच्या पातळीवरही त्यांचा विपरीत परिणाम होतो.” सुभाषने सांगितले. नेहमीसारखी मधली सुट्टी संपली नि आपली सूर्यज्ञानाविषयीच्या महितीची चर्चा अपूर्ण सोडून ती मुलं आपापल्या वर्गात गेली.