
दामले बाईंचा आज शाळेतील सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस होता. जवळजवळ ३६ वर्षे त्यांची सेवा झाली होती. शिक्षक पदापासून ते मुख्याध्यापिक पदापर्यंतची सर्व जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली होती. आयुष्याच्या कारकिर्दीत त्यांनी सुखदुःखाचा अनुभवही घेतला होता. रेल्वे अपघातात त्यांच्या वीस वर्षांचा मुलाचे निधन झाले होते. संस्थेतील प्रत्येक घटकांकडून त्यांना त्यावेळेस मिळालेला आधार खूप मोलाचा होता. दामले बाई, रक्तवर्णी गौरवर्ण व संवेदनशील मनाच्या होत्या. गरीब विद्यार्थ्यांविषयी त्यांच्या मनामध्ये कणव होती. एक माणूस म्हणून दामले बाईंनी शाळेतील प्रत्येक घटकाला समजून घेतले होते. पालकांविषयी आपुलकीची भावना होती. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला आवर्जून पालकही उपस्थित होते. दामले बाईंच्या घरातील आप्तेष्टही कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये भरभरून प्रत्येक जण दामले बाईंविषयी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त करत होते. शेवटी दामले बाई भाषण करण्यास उभ्या राहिल्या. त्यांच्या एका डोळ्यात आसू व दुसऱ्या डोळ्यात हसू दिसत होते. आपल्या कारकिर्दीत आपल्याला मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी प्रत्येकाचे ऋण व्यक्त केले. दामले बाईंना वडिलांसमान असणारे संस्थेचे प्रमुख देशमुख वयपरत्वे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. म्हणून दामले बाईं कार्यक्रम संपल्यानंतर थेट प्रमुखांच्या घरी गेल्या. देशमुख सरांच्या पत्नीला सुरेखशी साडी आणि देशमुख सरांच्या हातात भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. देशमुख सरांच्या पत्नीने दामले बाईंची खणानारळाने ओटी भरली. निघताना दामले बाईंनी, आपल्या लेकीकडून वडिलांना ही छोटीशी भेट असं म्हणत एक पाकीट देशमुख सरांच्या हातावर ठेवलं आणि त्या निघाल्या. दामले बाई निघून जातात सरांनी ते पाकीट उघडलं, आत काही रक्कम होती. तो कोरोनाचा काळ होता. विद्यार्थ्यांची फी ही वेळेवर येत नव्हती. संस्थेमार्फत ठेवण्यात आलेल्या शाळेतील काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार देणे मुश्कील झाले होते. देशमुख सरांनी त्या पाकिटातील रकमेमध्ये स्वतःकडील काही रक्कम टाकून कर्मचाऱ्यांना दिले. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला. अडचणीच्या काळात रक्कम छोटी असली तरी कर्मचाऱ्यांना ती लाखमोलाची वाटत होती. प्रत्येक जण मनोमनी खूश होऊन सरांना धन्यवाद देत होते. काही काळानंतर देशमुख सरांचे निधन झाले. मात्र त्यांच्या स्मृतीदिनाला कर्मचारी हा प्रसंग आवर्जून सांगून त्यांची आठवण काढतात. माणसं निघून जातात मात्र त्यांच्या आठवणी अशा प्रसंगातून कायम मनाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसतात. कविवर्य वि. दा. करंदीकर यांच्या काव्यपंक्ती आठवतात. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे तात्पर्य : हेच की दातृत्वाचा गुणधर्म आपणही अंगी बाणायला हवा.