राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. बोगस लाभार्थी यांच्या विरोधात राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याची माहिती आता समोर आली आहे.
पुणे- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांच्या विरोधात सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी मिळून आले आहेत. सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये तब्बल २६ लाख ३४ हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत. हे सर्व लाभार्थी प्रत्यक्षात पात्र नसतानाही दरमहा १५०० रुपयांचा निधी घेत होते.
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, यावर तोडगा म्हणून राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांची पुन्हा एकदा ई-केवायसीद्वारे पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी आहेत. यावर आज पुण्यात अजितदादांना विचारले असता त्यांनी थेट भूमिका न जाहीर करता, "...मग योजना बंद करू का?" अशी प्रतिक्रिया दिली.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४ हजार बोगस लाभार्थी आढळले. ठाण्यात १ लाख २५ हजार ३००, अहिल्यानगरमध्ये १ लाख २५ हजार ७५६, नाशिकमध्ये १ लाख ८६ हजार ८००, छत्रपती संभाजीनगरमध्ये १ लाख ४ हजार ७००, कोल्हापूरमध्ये १ लाख १४००, मुंबई उपनगरात १ लाख १३ हजार, नागपुरात ९५ हजार ५००, बीडमध्ये ७१ हजार, लातूरमध्ये ६९ हजार, सोलापूरमध्ये १ लाख ४ हजार, साताऱ्यात ८६ हजार, सांगलीत ९० हजार, पालघरमध्ये ७२ हजार, नांदेडमध्ये ९२ हजार, जालन्यात ७३ हजार, धुळ्यात ७५ हजार तर अमरावतीत ६१ हजार बोगस लाभार्थी उघडकीस आले.