
वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना व धोकादायक विजेचा खांब कोसळला. सुदैवाने, या अपघातात विद्यार्थी थोडक्यात बचावला.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विजेचा खांब खूप दिवसांपासून खराब अवस्थेत होता. त्यांनी महावितरण आणि स्थानिक पालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.
परिणामी, निष्काळजी प्रशासनामुळे निष्पाप विद्यार्थ्याचा जीव धोक्यात आला. या घटनेनंतर स्थानिकांनी महावितरण आणि पालिका प्रशासनाविरोधात निषेध नोंदवत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
संबंधित विभागांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी जनतेची मागणी आहे.