
न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा धबधब्याला भेट देऊन परतत असलेल्या पर्यटकांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात झाला. बसमध्ये ५४ जण होते त्यापैकी पाच जणांचा अपघातात मृत्यू झाला. अपघात बफेलो शहराच्या पूर्वेला सुमारे ४० किमी. अंतरावर झाला.
बसमध्ये प्रामुख्याने भारत, चीन आणि फिलिपिन्स या तीन देशांचे नागरिक होते. यापैकी अपघातात नेमक्या कोणाचा मृत्यू झाला हे अद्याप समजलेले नाही. प्राथमिक वृत्तानुसार चालकाने नियंत्रण गमावल्यामुळे बस दरीत कोसळली. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने उपचार करण्यासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी पोलीस आणि वैद्यकीय पथक मदतकार्यात गुंतले आहे. आठ हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
बस अपघातात ठार झालेल्यांमध्ये एकही मुल नाही. सर्व वयस्क पर्यटक आहेत. बस अपघात प्रकरणी पोलीस चालकाची चौकशी करत आहेत. अपघात प्रकरणी तपास सुरू आहे.