
अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय घसरून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. ज्याचा मृतदेह आज दुपारी बचाव पथकाच्या हाती लागला. शंतनू अविनाश मानकर (२५) असे मृत झालेल्या युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे,
मूर्तिजापूर येथील माना पोलीस ठाण्यांतर्गत खोळद गावाजवळ पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी शंतनू पहाटेच्या दरम्यान पेढी नदीवर गेला होता. तेव्हा हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेनंतर मुर्तीजापुर तहसीलदारांच्या सूचनेवरून शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधकार्याला तात्काळ सुरुवात करण्यात आली. मात्र नदीचा प्रवाह अधिक असल्यामुळे संबंधित युवकाचा शोध त्वरित लागू शकला नाही. त्यामुळे, दुसऱ्या दिवशी बोटीच्या सहाय्याने शंतनूचा शोध घेणे चालू ठेवले होते. अखेरीस आज दुपारी १२ वा, दरम्यान बचाव पथकाच्या सदस्यांना शंतनूचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.
शंतनूचा मृतदेह बाहेर काढून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. शंतनू हा अविनाश मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.