
मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे ९६ मंडळांनी शनिवारी लेझिम आणि ढोल – ताशांच्या गजरात गणेशमूर्ती मंडपात नेल्या. या मिरवणूका पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. परिणामी, अनेक मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवापूर्वीच गणेश आगमन मिरवणुका काढण्याची पय्था रूढ झाली आहे. मुंबईतील विविध ठिकाणच्या ९६ मंडळांची गणेशमूर्ती शनिवारी वाजतगाजत मंडपस्थळी मार्गस्थ झाली. यंदा शासनाने मोठ्या आवाजातील वाद्यांवर बंदी घातल्याने पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्तींचे आगमन झाले. काही मंडळांनी ध्वनिक्षेपकावर गाणी लावून जल्लोष साजरा केला. अनेक मंडळांनी मिरवणुकीत केवळ ढोल – ताशा, लेझिमचा वापर करून पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढल्या.
चांदिवलीचा राजा, मरोळचा मोरया, गोरेगावचा महाराजा, विघ्नहर्ता एल्फिन्स्टनचा, विक्रोळीचा गणराज, अँटॉप हिलचा राजा, मालाडचा महागणपती, भटवाडीचा राजा आदी विविध गणेश मंडळांच्या मूर्तींचे शनिवारी आगमन झाले. काही मंडळांनी सामाजिक संदेश देणारे फलक आणि झांजपथकाचाही मिरवणुकीत समावेश केला. या मिरवणुकींमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. दादर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, अंधेरी आदी भागांमध्ये वाहनचालकांना विलंबाचा सामना करावा लागला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.