Friday, August 22, 2025

विद्यार्थ्यांनी मोबाइलचा अतिवापर टाळावा

विद्यार्थ्यांनी मोबाइलचा अतिवापर टाळावा

मोबाइलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. ही त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून धोक्याची घंटा आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत. त्यामुळे त्यांनी मोबाइलचा अतिवापर टाळावा. आपल्याकडे अपेक्षेप्रमाणे मोबाइलच्या अतिवापरा संदर्भातील दुष्परिणामाबाबत जनजागृती होत नाही. ती होणे गरजेचे आहे.

पल्या लोकशाहीप्रधान भारत देशाचा १५ ऑगस्ट २०२५ रोजी ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने आणि विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण झाली. मात्र मोबाइलचा विचार करता वैज्ञानिक युगात वावरणारे आजचे विद्यार्थीवर्ग मोबाइलचा अतिवापर करताना दिसत आहेत. मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांची विचार करण्याची शक्ती हळूहळू कमी होते. काही वेळा आपण काय करावे आणि काय नाही याची कल्पना मुलांना येत नाही. त्यात ते कधी कधी गोंधळून जातात. हे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे. तेव्हा देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य वर्षापासून मोबाइलचा अतिवापर करणार नाही यासाठी केवळ विद्यार्थीच नव्हे तर आपण सर्वजणांनी आज वचनबद्ध होऊया.

मोबाइलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. ही त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून धोक्याची घंटा आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत त्यामुळे त्यांनी मोबाइलचा अतिवापर टाळावा. मोबाइलचा वापर आवश्यक कामासाठीच करण्यात यावा. सध्या तरी विद्यार्थ्यांना मोबाइलचे व्यसन लागले आहे. कायम त्यांच्या हातात मोबाइल दिसतो, तो दूर ठेवणे आवश्यक आहे. याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांना त्रास होणे, झोप न लागणे, मानसिक दडपण, मन चलबिचल होणे, थोरांचे ऐकायचे नाही, मनमानी कारभार, मान व पाठ दुखी अशा अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. काही मुले तर झोपेत सुद्धा हातात मोबाइल धरून झोपतात. त्यात काही उशीच्या खाली लपवून मोबाइल ठेवतात. डॉक्टर सांगतात, आपण झोपताना मोबाइल दूर ठेवावा, याचे काय? तेव्हा देशातील सुजाण नागरिकांनी विचार करून उद्यापासून म्हणण्यापेक्षा आजपासून मोबाइलला दूर ठेवून योग्य ती काळजी घेतली पाहिजे. आजच्या युगात मोबाइल ही मूलभूत गरज झाली असली तरी त्याचा अतिवापर टाळावा. तेव्हा यात इतरांना दोष देण्यापेक्षा आई-वडिलांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र हल्ली काही मुले आई-वडिलांचे ऐकत नाहीत.

तुम्हाला काय कळते? असा प्रती सवाल आपल्या आई-वडिलांना करतात. तेव्हा घरात भांडण नको म्हणून आई-वडील दुर्लक्ष करतात. अलीकडे तर मोबाइलचा विचार करता मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांची पुरेशी झोप होत नाही. म्हणजे कारण नसताना जागरण होते. हे जागरण आरोग्याला अपायकारक असते. याऐवजी एखादा खेळ खेळणे गरजेचे आहे. म्हणजे तेवढा ताण डोळ्यांवर येत नाही. म्हणूनच आवश्यक कामासाठी मोबाइलचा वापर करावा म्हणजे मोबाइलचा वापर कमी होईल किंवा मोबाइल वापरण्यावर मर्यादा येईल. ही आरोग्यासाठी चांगली बाब आहे. मी आवश्यक कामासाठी मोबाइलचा वापर करीन असे प्रत्येकांनी ठरविले पाहिजे. तसेच मोबाइलवर जास्त न बोलता आवश्यक तेवढेच बोलेन असे ठरवावे. त्यासाठी प्रत्येकांनी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. केवळ मोबाइलवर वेळ घालविण्यापेक्षा आपल्या कुटुंबीयांसमवेत व मित्रांसोबत काही वेळ गप्पागोष्टीत घालवावा. तेवढे मन मोकळे होते. महत्त्वाची बाब म्हणजे, अशांसोबत मनमोकळेपणाने वेळ घालवावा, यातूनच खरी ऊर्जा मिळते. आजच्या तरुणाईला अशा गप्पागोष्टींची गरज आहे. तेव्हा मोबाइलच्या वापरावर स्वत:हून निर्बंध घातले पाहिजेत. उदाहरणार्थ सकाळी चहा, नाश्ता, जेवण करताना मोबाइलवर बोलू नये. तसेच झोपल्यावर मोबाइल आपल्यापासून दूर ठेवावा. केवळ मोबाइल एके मोबाइल नको तर आपल्याला मनोरंजनाकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. मनोरंजनामुळे आपले मनोरंजन होत असते, त्याचप्रमाणे मन सुद्धा मोकळे झाल्याने कोणत्याही प्रकारचे दडपण येत नाही. तेवढा डोळ्यांना सुद्धा आराम मिळतो. एखाद्या विषयावर एकमेकांशी सुसंवाद साधावा म्हणजे तेवढीच आपल्या ज्ञानात भर पडत असते. त्यात अधिक आराम हवा असेल तर काही काळ मोबाइल बंद करून ठेवल्यास अधिक चांगले. मात्र कामात अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. काही वेळा आपल्या कुटुंबाचा सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही. त्याचे पालन करणे आपल्या हातात आहे. चांगल्या सल्ल्यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. कारण घरगुती सल्ला हा अनुभवातून व मोफत असतो, हे विसरता कामा नये.

मोबाइलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागले आहेत. याचा सर्वात जास्त दुष्परिणाम डोळ्यांवर झालेला दिसून येत आहे. याचा परिणाम अतिवापर करणाऱ्या मोबाइलधारकांच्या शरीरावर होऊ लागला आहे. ही त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. तेव्हा मोबाइलच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. आपल्याकडे अपेक्षेप्रमाणे मोबाइलच्या अतिवापरा संदर्भातील दुष्परिणामाबाबत जनजागृती होत नाही. ती होणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभागाने व जागृत नागरिकांनी पुढे येऊन आवाज उठविला पाहिजे. ही विद्यार्थ्यांसाठी आजच्या काळाची गरज आहे. कारण भारत हा तरुणांचा देश आहे, असे आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात म्हणत असतात. तेव्हा देशातील तरुण तंदुरुस्त होण्यासाठी त्याला मोबाइलच्या अतिवापराच्या दृष्ट चक्रातून बाहेर काढावे लागेल. तसेच मुलांनी सुद्धा मोबाइलचे दुष्परिणाम लक्षात घेऊन सतर्क राहायला हवे. तेव्हा देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य वर्षांत सध्याच्या विद्यार्थ्यांना भविष्यात निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आतापासून मोबाइलचा अतिवापर टाळण्यासाठी जागरूत करूया.

- रवींद्र तांबे

Comments
Add Comment