Saturday, August 23, 2025

'चाकरमानी' नाही 'कोकणवासी' म्हणा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश

'चाकरमानी' नाही 'कोकणवासी' म्हणा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश

मुंबई : कोकणातून मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना यापुढे 'चाकरमानी' असे म्हणायचे नाही तर 'कोकणवासी' संबोधित करायचे असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. लवकरच या संदर्भातले परिपत्रक काढण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. वर्षानुवर्षे कोकणवासीयांना चाकरमानी म्हणत होते पण हे अवमानकारक असे संबोधन सरकारी कामकाजातून हटवावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केली आहे.

'चाकरमानी' हा शब्द कोकणातून मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या व्यक्तींसाठी वापरला जातो. गेल्या अनेक दशकांपासून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील नागरिक कामाच्या, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहून उदरनिर्वाह करतात. या नागरिकांनी गावाशी असलेली नाळ जपली आहे. शिमगा, गणेशोत्सव, दिवाळी किंवा इतर सणांच्या निमित्ताने ही मंडळी गावी जाऊन येतात. गावाकडे त्यांचा उल्लेख 'चाकरमानी' असा करतात.

प्रत्यक्षात 'चाकरमानी' हा शब्द चाकर म्हणजेच सेवक आणि मानी म्हणजेच मालकाचे आदेश मानणारा किंवा पाळणारा अशा अर्थाने तयार झाला आहे. कोकणवासीयांच्या काही संघटनांना हा शब्द कमीपणाचा वाटत असल्याने त्यांनी चाकरमानी या शब्दावर हरकत घेतली आहे. त्यांच्या मते, हा शब्द कोकणवासीयांच्या मेहनतीला आणि स्वाभिमानाला कमी लेखणारा आहे. त्यामुळे या संघटनांच्या मागणीनुसार महायुती सरकार कडून चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासीयांच्या सांस्कृतिक ओळखीला सन्मान देण्यासाठी कोकणवासी हा शब्द वापरण्यात येणार आहे.

Comments
Add Comment